पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग  Pudhari File Photo
राष्ट्रीय

Dr. Manmohan Singh: उदारीकरणाचे शिल्पकार, जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : भारताचे चौदावे पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग हे जगप्रसिद्ध अर्थतज्ज्ञ, विचारवंत आणि अभ्यासक म्हणून प्रसिद्ध होते. सदैव नम्र, विनयशील, कठोर परिश्रम आणि कामाप्रती बांधिलकी ही डॉ. मनमोहन सिंग यांची स्वभाव वैशिष्ट्ये होत. डॉ. मनमोहन सिंग यांचा जन्म 26 सप्टेंबर 1932 रोजी अविभाजित भारतातील पंजाब प्रांतातील एका गावात झाला. डॉ. सिंग यांनी 1948 साली पंजाब विद्यापीठातून मॅट्रिक पूर्ण केले. त्यानंतर त्यांनी पुढील शिक्षण इंग्लंडच्या केंब्रिज विद्यापीठातून घेतले. 1957 मध्ये त्यांनी अर्थशास्त्रात पदवी प्राप्त केली. त्यानंतर 1962 मध्ये त्यांनी ऑक्सफर्ड विद्यापीठातून अर्थशास्त्रात पीएचडी मिळवली. त्यांनी त्यांच्या भारतातील निर्यात, आत्मनिर्भरता आणि विकासाच्या शक्यता या पुस्तकात भारतातील निर्यात आधारित व्यापार धोरणावर भाष्य केले.

अर्थशास्त्राचे प्राध्यापक, रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर ते पंतप्रधान

डॉ. सिंग यांनी पंजाब विद्यापीठ आणि दिल्ली स्कूल ऑफ इकॉनॉमिक्समध्ये प्राध्यापक म्हणूनही काम केले. दरम्यान, त्यांनी काही वर्षे संयुक्त राष्ट्रांच्या व्यापार आणि विकास परिषदेच्या सचिवालयातही काम केले. पुढे 1987 आणि 1990 मध्ये जीनिव्हा येथील दक्षिण आयोगाचे महासचिव म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली. 1971 मध्ये डॉ. सिंग वाणिज्य मंत्रालयात आर्थिक सल्लागार म्हणून रुजू झाले. 1972 मध्ये त्यांची अर्थ मंत्रालयात मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून नियुक्ती करण्यात आली. डॉ. मनमोहन सिंग यांनी अर्थ मंत्रालयाचे सचिव, नियोजन आयोगाचे उपाध्यक्ष, भारतीय रिझर्व्ह बँकेचे अध्यक्ष, पंतप्रधानांचे सल्लागार, विद्यापीठ अनुदान आयोगाचे अध्यक्ष म्हणूनही काम केले. डॉ. सिंग यांनी 1991 ते 1996 या काळात भारताचे अर्थमंत्री म्हणून काम केले, हा स्वतंत्र भारताच्या आर्थिक इतिहासातील एक निर्णायक काळ होता. आर्थिक सुधारणांसाठी सर्वसमावेशक धोरण ठरवण्याच्या त्यांच्या भूमिकेचे सर्वांनी कौतुक केले. भारतात ही वर्षे डॉ. सिंग यांच्या व्यक्तिमत्त्वाचा अविभाज्य भाग म्हणून ओळखली जातात.

सलग 33 वर्षे राज्यसभेवर सदस्य

डॉ. मनमोहन सिंग त्यांच्या राजकीय कारकिर्दीत 1991 पासून एप्रिल 2024 पर्यंत राज्यसभेवर होते. दीर्घकाळ भारतीय राजकारणात विविध महत्त्वाच्या पदांवर राहिलेले डॉ. मनमोहन सिंग कधीही लोकसभेचे सदस्य नव्हते. 1999 ते 2004 पर्यंत ते राज्यसभेत विरोधी पक्षनेते होते. 2004 च्या सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीनंतर काँग्रेस प्रणीत संपुआला बहुमत मिळाले. त्यानंतर त्यांनी पंतप्रधान म्हणून शपथ घेतली. मे 2009 मध्ये झालेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकांमध्येही पुन्हा एकदा काँग्रेसप्रणीत संपुआला बहुमत मिळाले आणि ते दुसर्‍यांदा पंतप्रधान झाले. डॉ. सिंग आणि त्यांच्या पत्नी श्रीमती गुरशरण कौर यांना तीन मुली आहेत.

अनेक प्रतिष्ठित पुरस्कारांचे मानकरी

1956 : केंब्रिज विद्यापीठाचा डम स्मिथ पुरस्कार 1955 : सेंट जॉन्स कॉलेज, केंब्रिज येथे उत्कृष्ट कामगिरीसाठी राईट पारितोषिक 1987 : भारताचा दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण 1993-1994 : आशिया मनी अ‍ॅवॉर्ड फॉर फायनान्स मिनिस्टर ऑफ द इयर 1993 : अर्थमंत्र्यांसाठी दिला जाणारा युरो मनी पुरस्कार 1995 : भारतीय विज्ञान काँग्रेसचा जवाहरलाल नेहरू जन्मशताब्दी पुरस्कार

डॉ. मनमोहन सिंग यांना जपानी निहोन केझाई शिंबून आणि इतरही जागतिक संघटनांकडून सन्मानित करण्यात आले होते. खेरीज, त्यांना केंब्रिज, ऑक्सफर्ड आणि इतर अनेक जगप्रसिद्ध विद्यापीठांनी मानद पदव्या बहाल केल्या. डॉ. सिंग यांनी अनेक आंतरराष्ट्रीय संस्था आणि परिषदांमध्ये भारताचे प्रतिनिधित्व केले. त्यांनी 1993 मध्ये सायप्रस येथे झालेल्या राष्ट्रकुल प्रमुखांच्या बैठकीमध्ये आणि व्हिएन्ना येथे मानवाधिकारावरील जागतिक परिषदेत भारतीय शिष्टमंडळाचे नेतृत्व केले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT