नवी दिल्ली :आम आदमी पक्षाचे (आप) राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांच्या उच्च शिक्षणासाठी डॉ. आंबेडकर सन्मान शिष्यवृत्तीची घोषणा केली. ही शिष्यवृत्ती भाजप आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना प्रत्युत्तर आहे. त्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा अवमान केला आहे, असे केजरीवाल म्हणाले.
अरविंद केजरीवाल यांनी आम आदमी पक्षाच्या कार्यालयात एका कार्यक्रमात या शिष्यवृत्तीची घोषणा केली. ते म्हणाले की, या शिष्यवृत्ती योजनेंतर्गत, दिल्ली सरकार अनुसूचित जातीतील विद्यार्थ्यांनी जगभरातील सर्वोच्च विद्यापीठांमध्ये प्रवेश घेतल्यानंतर त्यांचा संपूर्ण खर्च भागवेल. दलित समाजातील सरकारी कर्मचारीही या शिष्यवृत्तीचा लाभ घेऊ शकतात, असे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, दलित समाजातील कोणतीही व्यक्ती उच्च शिक्षणापासून वंचित राहू नये, त्यासाठी डॉ. आंबेडकर शिष्यवृत्ती जाहीर करत आहे. अनुसूचित जातीतील कोणताही विद्यार्थी जो जगभरातील आघाडीच्या विद्यापीठांमध्ये शिकण्यासाठी इच्छुक असेल, त्याचा संपूर्ण खर्च दिल्ली सरकार उचलेल.
दरम्यान, बुधवारी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी राज्यसभेत आपल्या भाषणात, डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी वक्तव्य केले होते. त्यानंतर इंडिया आघाडीने त्यांच्यावर टीकेची झोड उठवली आहे. त्याचाच एक भाग म्हणून आम आदमी पक्षाने दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर शिष्यवृत्तीची घोषणा केली आहे.