पुढारी ऑनलाईन डेस्क : चीनकडून भारताला नेमका कोणता धोका आहे हे मला समजत नाही. मला वाटतं की, हा मुद्दा नेहमीच कारण नसताना अधिक चर्चेला जातो. मेरिकेचा स्वभाव शत्रूंना लक्ष्य करण्याचा आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे जेव्हा सर्व देशांनी एकत्र यावे आणि संघर्ष करू नये, असे मत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते सॅम पित्रोदा यांनी एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत व्यक्त केले आहे. दरम्यान, भारतीय जनता पक्षानेही काँग्रेस नेत्याच्या या विधानावर हल्लाबोल केला आहे. याआधीही पित्रोदा त्यांच्या विधानांमुळे वादात सापडले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यातील भेटीबद्दल विचारलेल्या प्रश्नावर 'आयएएनएस'शी बोलताना सॅम पित्रोदा म्हणाले की, "चीनकडून काय धोका आहे हे मला समजत नाही. मला वाटतं की हा मुद्दा नेहमीच जास्त प्रमाणात उचलला जातो कारण अमेरिकेचा स्वभाव शत्रूंना लक्ष्य करण्याचा आहे. मला वाटतं आता वेळ आली आहे जेव्हा सर्व देशांनी एकत्र यावे आणि संघर्ष करू नये."
चीनबरोबर आमचा दृष्टिकोन सुरुवातीपासूनच संघर्षाचा राहिला आहे. या दृष्टिकोनामुळे शत्रू निर्माण होतात. त्या बदल्यात, देशांतर्गत पाठिंबा मिळतो. आपल्याला ही मानसिकता बदलावी लागेल आणि पहिल्या दिवसापासून चीन आपला शत्रू आहे, असे मानणे थांबवावे लागेल. हे चुकीचे आहे आणि फक्त चीनमध्येच नाही, तर हे सर्वांमध्येच चुकीचे आहे.
सॅम पित्रोद त्यांच्या विधानावर भाजपने पलटवार केला आहे. भाजप प्रवक्ते तुहिन सिन्हा म्हणाले की, "ज्यांनी आमची ४० चौरस किलोमीटर जमीन चीनला दिली, त्यांना चीनकडून कोणताही धोका दिसत नाही. राहुल गांधी चीनला घाबरतात आणि आयएमईईसीच्या घोषणेपूर्वीच बीआरआयसाठी आग्रह धरत होते यात आश्चर्य नाही."
सॅम पित्रोदा यांनी म्हटलं आहे की, चीनशी कोणताही वाद नाही. याचा अर्थ असा आहे की भारत आक्रमक आहे. ते काँग्रेसचे प्रमुख नाहीत तर ओव्हरसीज काँग्रेसचे प्रमुख आहेत. गंभीर मुद्दा असा आहे की सॅम पित्रोदा यांचे हे व्यक्तिगत मत नाही. राहुल गांधी यांनी यापूर्वीही अशीच भावना आणि विचारसरणी व्यक्त करणारी अनेक विधाने केली आहेत, असे भाजपचे राज्यसभा खासदार आणि राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी म्हटलं आहे.