राष्ट्रीय

घरगुती गॅस सिलिंडर शंभर रुपयांनी स्वस्त

दिनेश चोरगे

नवी दिल्ली; पुढारी वृत्तसेवा : महिला दिनाचे औचित्य साधून आम जनतेला मोठा दिलासा देताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घरगुती गॅस सिलिंडरची (14.2 किलो) किंमत 100 रुपयांनी कमी करण्याची घोषणा केली आहे. गेल्या सात महिन्यांपासून 14.2 किलोच्या सिलिंडरचा भाव 902.50 रुपये होता. तो आता 802.50 रुपयांवर आला आहे.

यासंदर्भात पंतप्रधानांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर म्हटले आहे की, या निर्णायमुळे देशातील लाखो कुटुंबांवरील आर्थिक भार कमी होणार आहे. हे पाऊल पर्यावरण रक्षणासाठीही उपयुक्त ठरेल आणि त्यामुळे संपूर्ण कुटुंबाचे आरोग्य सुधारेल.
या कपातीनंतर दिल्लीत घरगुती गॅस सिलिंडरची किंमत 903 रुपयांवरून 803 रुपये, मुंबई 902.50 रुपयांवरून 802.50 रुपये, भोपाळमध्ये 808.50 रुपये, जयपूरमध्ये 806.50 रुपये आणि पाटणात 901 रुपये झाली आहे. विशेष म्हणजे, जून 2023 मध्ये गॅस सिलिंडरची किंमत 1,100 रुपयांवर पोहोेचली होती. यानंतर रक्षाबंधनाच्या मुहूर्तावर सरकारने घरगुती गॅस सिलिंडरच्या (14.2 किलो) दरात 200 रुपयांची कपात केली होती. त्यानंतर दिल्लीत किंमत 1,103 रुपयांवरून 903 रुपये, भोपाळमध्ये 908 रुपये, जयपूरमध्ये 906 रुपये झाली होती. पाठोपाठ आता या किमतीत आणखी शंभर रुपयांची कपात करण्यात आली आहे.

सात महिन्यांपासून दरवाढ नव्हती

सरकारी तेल कंपन्यांनी गेल्या सात महिन्यांपासून घरगुती गॅसच्या किमतीत दरवाढ केलेली नाही. आता आधीच्या किमतीत 100 रुपयांची कपात करण्यात आली आहे. या बदलामुळे ग्राहकांना मोठा दिलासा मिळाला आहे. केंद्र सरकारने अलीकडेच प्रधानमंत्री उज्ज्वला योजनेंतर्गत सिलिंडरवर दिले जाणारे 300 रुपयांचे अनुदान 31 मार्च 2025 पर्यंत वाढवले आहे. 7 मार्च रोजी झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय घेण्यात आला. अनुदानित सिलिंडरच्या संख्येतही वाढ करण्यात आली आहे. पूर्वी 10 सिलिंडरवर अनुदान मिळत होते, आता ते 12 करण्यात आले आहे.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT