वाराणसी; वृत्तसंस्था : उत्तर प्रदेशातील वाराणसी येथील प्रसिद्ध बनारस हिंदू विद्यापीठाच्या ट्रॉमा सेंटरमध्ये डॉक्टरांच्या अजब आणि भयंकर निष्काळजीपणामुळे एका 71 वर्षीय वृद्ध महिलेला आपला जीव गमवावा लागला आहे. मणक्याच्या ट्यूमरवर शस्त्रक्रिया करायची असताना डॉक्टरांनी चक्क महिलेच्या मांडीवर शस्त्रक्रिया केल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. याप्रकरणी आता उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.
अमृतपूर येथील राधिका देवी (वय 71) यांना मणक्याच्या ट्यूमरच्या त्रासामुळे 25 फेब्रुवारी रोजी बीएचयू रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. डॉक्टरांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू होते. 7 मार्च रोजी त्यांना शस्त्रक्रियेसाठी नेण्यात आले. नातवाने केलेल्या आरोपानुसार, डॉक्टरांनी मणक्याची शस्त्रक्रिया सोडून त्यांच्या मांडीवर शस्त्रक्रिया केली. ‘जेव्हा मांडीत कोणतेही फ्रॅक्चर किंवा दोष आढळला नाही, तेव्हा डॉक्टरांनी घाईघाईने जखम शिवली आणि त्यांना आयसीयूमधून बाहेर आणले,’ असा दावा त्यांच्या नातवाने, मृत्युंजय पाल यांनी केला आहे.