पुढारी ऑनलाईन डेस्क : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत देशाचे नवे मुख्य निवडणूक आयुक्त (CEC) म्हणून ज्ञानेश कुमार यांच्या नावाला मान्यता देण्यात आली आहे. कायदा मंत्रालयाने पुढील मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्तीसाठी अधिसूचना देखील जारी केली आहे. देशाचे २६ वे निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्त झालेले ज्ञानेश कुमार १९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी आहेत. सध्याचे मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार आज १८ फेब्रुवारी रोजी निवृत्त होत आहेत, त्यांच्या निवृत्तीनंतर कुमार पदभार स्वीकारतील.
सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा समावेश असलेल्या निवड समितीने कुमार यांचे नाव अंतिम केले आणि त्यांची शिफारस केली. काँग्रेसने नवीन निवड प्रक्रियेला विरोध केला होता. निवड समितीमध्ये बदल करणाऱ्या केंद्राच्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेबाबत सर्वोच्च न्यायालयाच्या १९ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या सुनावणीपर्यंत नियुक्ती करू नये अशी मागणी केली होती. नवीन मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार २६ जानेवारी २०२९ पर्यंत पदावर राहतील. कुमार या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुका तसेच २०२६ मध्ये होणाऱ्या केरळ, तामिळनाडू, पश्चिम बंगाल आणि पुद्दुचेरी विधानसभा निवडणुकांचे निरीक्षण करतील. निवडणूक आयोगात येण्यापूर्वी, त्यांनी सरकारमध्ये अनेक महत्त्वाची पदे भूषवली आहेत. संरक्षण मंत्रालय आणि गृह मंत्रालयात संयुक्त सचिव म्हणून काम केले आहे, तिथे त्यांनी अतिरिक्त सचिव म्हणूनही काम केले आहे.
१९८८ च्या बॅचचे केरळ कॅडरचे आयएएस अधिकारी असलेले ज्ञानेश कुमार गेल्या वर्षी मार्चपासून निवडणूक आयुक्त म्हणून काम करत आहेत. मार्च २०२४ पासून निवडणूक आयुक्त म्हणून काम करत होते. त्यांना प्रशासकीय सेवेचा ३७ वर्षांहून अधिक अनुभव आहे. कुमार यांनी आयआयटी कानपूरमधून सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये बी.टेक पदवी प्राप्त केली आहे. त्यांनी इन्स्टिट्यूट ऑफ चार्टर्ड फायनान्शियल अॅनालिस्ट्स ऑफ इंडियामधून बिझनेस फायनान्सचा अभ्यास केला आहे. त्यांनी हार्वर्ड विद्यापीठातून पर्यावरणीय अर्थशास्त्रात पदवी देखील घेतली आहे. जानेवारी २०२४ मध्ये सहकार मंत्रालयाच्या सचिवपदावरून ते निवृत्त झाले. यानंतर त्यांची निवडणूक आयुक्त म्हणून नियुक्ती झाली. सहकार मंत्रालयापूर्वी त्यांनी केंद्रीय गृह मंत्रालयात अनेक जबाबदाऱ्या सांभाळल्या आहेत.