पुढारी ऑनलाईन डेस्क : ईशा फाउंडेशनचे संस्थापक, सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी महाशिवरात्री कार्यक्रमाचे आमंत्रण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांना दिले. बुधवारी झालेल्या कार्यक्रमात शिवकुमार हे केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासोबत एका व्यासपीठावरही बसले. मात्र जग्गी वासुदेवांचे निमंत्रण काँग्रेसला रुचले नसल्याचे स्पष्ट झाले आहे. अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) सचिव पीव्ही मोहन यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X वर पोस्ट करत आपली नापसंती व्यक्त केली. तसेच काही सवालही उपस्थित केले आहेत. दरम्यान, शिवकुमार यांनी आमंत्रण स्वीकारण्यामागील आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
महाशिवरात्रीनिमित्ता कोइम्बतूर येथील सद्गुरूंच्या ईशा योग केंद्रात ईशा फाउंडेशनच्या वतीने उत्सवाचे आयोजन केले जाते. या कार्यक्रमाचे आंमत्रण कर्नाटकचे उपमुख्यमंत्री डी. के. शिवकुमार यांनाही देण्यात आले होते. त्यांनीही ते स्वीकारत सोशल मीडियावर पोस्ट करत सद्गुरू जग्गी वासुदेव यांचे आभार मानले. शिवकुमार यांनी ईशा योग केंद्रातील त्यांच्या अनुभवाबद्दल सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर शेअर केले. तसेच आमंत्रणाचा फोटो आणि सद्गुरुंना "धन्यवाद" अशी पोस्टही केली.
डी. के. शिवकुमारांनी केलेल्या पोस्टवर अखिल भारतीय काँग्रेस समिती (एआयसीसी) सचिव पीव्ही मोहन यांनी नाराजी व्यक्त केली. Xवर केलेल्या पोस्टमध्ये त्यांनी शिवकुमार यांच्या कृतीमुळे पक्षाचे नुकसान होते, असे म्हटलं. तसेच शिवकुमार यांना टॅग करून त्यांनी त्यांच्या पोस्टमध्ये विचारले की, "एका धर्मनिरपेक्ष पक्षाचे अध्यक्ष असताना राहुल गांधींची खिल्ली उडवणाऱ्या व्यक्तीचे ते आभार कसे मानू शकतात, असा सवालही केला आहे.
मी टीका करत नाहीये, मी फक्त शिवकुमार यांच्या वैचारिक मार्गांबद्दल माझे मत व्यक्त करत होतो, ईशा फाउंडेशन आणि जग्गी वासुदेव यांच्या विचारसरणी भाजप आणि आरएसएसशी जुळतात. आम्ही आरएसएसच्या विचारसरणीच्या पूर्णपणे विरोधात आहोत आणि राहुल यांनी वारंवार नमूद केले आहे की, जो कोणी आरएसएसच्या विचारसरणीचे पालन करतो तो पक्ष सोडू शकतो,” असे मोहन यांनी 'इंडिया टुडे'ला सांगितले. तसेच शिवकुमार मंदिरांना भेट देण्याबाबत कोणताही आक्षेप नाही मात्र कर्नाटक काँग्रेसचे अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहताना त्यांच्या कृती पक्षाची मूल्य ठरवतात, असेही त्यांनी म्हटलं आहे.
या प्रकरणी बोलताना शिवकुमार म्हणाले की, ईशा फाउंडेशनचे संस्थापक, सद्गुरू जग्गी वासुदेव यांच्या कार्यक्रमाला जात आहे याचा अर्थ मी भाजपच्या जवळ जातोय, असा होत नाही. मी जन्मतः काँग्रेसी आहे. महाकुंभाला भेट देणे हा माझा विश्वास आहे. मी सर्व धर्मांचा आदर करतो, असे स्पष्ट करत मला सद्गुरुंनी आमंत्रित केले आहे, म्हणून मी तिथे जाणार आहे. मी जन्मतः हिंदू आहे आणि सर्व धर्मांवर प्रेम करतो, असेही शिवकुमार यांनी मंगळवारी सायंकाळीच स्पष्ट केले होते.