Shravan 2025 wife carries husband to Haridwar file photo
राष्ट्रीय

प्रेमात आहे 'असीम' ताकद! दिव्यांग पतीला खांद्यावर घेऊन पत्नीनं पार केला १७० किमीचा हरिद्वारचा प्रवास!

इंदूरमध्ये 'हनिमून'वर गेलेल्या पतीच्या निर्घृण हत्येसारख्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असतानाच, दुसरीकडे एक हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे. दिव्यांग पतीला खांद्यावर घेऊन पत्नीने महादेवाला अभिषेक केला.

मोहन कारंडे

Shravan 2025 :

हरिद्वार : गेल्या महिन्यात इंदूरमध्ये 'हनिमून'वर गेलेल्या पतीच्या निर्घृण हत्येसारख्या घटनांनी संपूर्ण देश हादरला असतानाच, दुसरीकडे एक अशी हृदयस्पर्शी घटना समोर आली आहे, जी प्रेम, समर्पण आणि श्रद्धेचं खरंखुरं उदाहरण आहे. एका पत्नीने आपल्या दिव्यांग पतीला खांद्यावर घेत तब्बल १७० किलोमीटरचा प्रवास केला आणि हरिद्वारमध्ये पोहोचून दक्षिणेश्वर महादेवाच्या चरणी जलाभिषेक केला.

उत्तर भारतातील पंचांगानुसार आजपासून (दि. १४) श्रावण मास सुरू झाला आहे. श्रावणातील पहिला सोमवार शिवभक्तांसाठी विशेष महत्त्वाचा असतो. सोमवारी हरिद्वारमध्ये श्रद्धेचं एक अनोखं उदाहरण पाहायला मिळालं. उत्तर प्रदेशातील मोदीनगर येथे सचिन आणि त्याची पत्नी राहतात. सचिन एक वर्षापूर्वी पायांनी अपंग झाला. श्रावणात हरिद्वारला जाऊन भगवान शंकरावर जलाभिषेक करण्याचा त्याने संकल्प केला होता. शरीराने अशक्त असला तरी त्याची मनापासून श्रद्धा होती. त्यांचं हे स्वप्न पत्नीने आपले मानून पूर्ण केले. सोमवारी ती सचिनला हरिद्वारला घेऊन गेली आणि खांद्यावर बसवून मंदिरात दर्शन घेतले. दोघांनी कनखल येथील प्राचीन दक्षिणेश्वर महादेव मंदिरात जलाभिषेक केला. सचिनसोबत त्यांची दोन मुलेही होती. खऱ्या प्रेमाचा आणि समर्पणाचा अर्थ शिकवणाऱ्या त्या दोघांचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

भगवान शंकराला केलाय नवस

IANS या वृत्तसंस्थेशी बोलताना सचिनने सांगितले की, "मी यापूर्वी १३ वेळा कावड आणली होती. गेल्या एका वर्षापासून मी दिव्यांग आहे. यावेळी माझ्या पत्नीच्या मनातही श्रद्धा जागृत झाली आणि ती मला इथे घेऊन आली. मी भगवान शंकराकडे माझ्या आरोग्यासाठी नवस मागितला आहे." सचिनने पुढे सांगितले की, "कुटुंबात सुख-शांती नांदावी आणि त्याचे शरीर निरोगी राहावे यासाठी दरवर्षी तो श्रावणात यात्रा करतो. त्याच्या मते, ही यात्रा त्यांच्यासाठी श्रद्धा, समर्पण आणि विश्वासाचे प्रतीक आहे."

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT