Divya Deshmukh FIDE Women's World Cup 2025
बाटुमी (जॉर्जिया): बुद्धिबळाच्या पटावर एका नव्या युगाचा प्रारंभ झाला आहे. नागपूरच्या अवघ्या १९ वर्षीय दिव्या देशमुखने अनुभवी कोनेरू हंपीला चित्तथरारक लढतीत नमवत फिडे महिला विश्वचषक जिंकला. या एकाच विजयाने तिने केवळ विश्वविजेतेपदावरच नव्हे, तर 'ग्रँडमास्टर' किताबावरही शिक्कामोर्तब केले. विजयावर शिक्कामोर्तब होताच दिव्याला भावना अनावर झाल्या आणि तिने आपल्या आईला मारलेली भावनिक मिठी चर्चेचा विषय ठरली आहे.
ही लढत केवळ दोन खेळाडूंमधील नव्हती, तर दोन पिढ्यांमधील होती. एकीकडे ३८ वर्षीय अनुभवी हंपी, तर दुसरीकडे तरुण आणि महत्त्वाकांक्षी दिव्या. शनिवार व रविवारचे दोन्ही क्लासिकल डाव बरोबरीत सुटल्याने विजेतेपदाचा निर्णय टायब्रेकरवर गेला. टायब्रेकरमध्ये दिव्याने संयम आणि आक्रमकतेचा सुंदर मिलाफ साधत १.५-०.५ असा विजय मिळवला. दुसऱ्या डावात वेळेच्या दबावाखाली असलेल्या हंपीने ४० व्या चालीवर केलेल्या एका चुकीचा फायदा उचलत दिव्याने इतिहासाच्या पानांवर आपले नाव कोरले.
या स्पर्धेत एकही जीएम नॉर्म नसताना प्रवेश केलेल्या दिव्याने थेट विश्वविजेतेपद आणि ग्रँडमास्टर किताब पटकावून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. या विजयासह दिव्या भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि कोनेरू हंपी, हरिका द्रोणावल्ली व आर. वैशाली यांच्यानंतर चौथी महिला ग्रँडमास्टर ठरली आहे. विजयानंतर दिग्गज हंपीशी हस्तांदोलन करून ती थेट आईकडे धावली. आईला मारलेल्या कडक मिठीत तिचे अश्रू थांबत नव्हते. मायलेकींच्या या भावनिक क्षणांचा व्हिडिओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे, २००२ साली हंपी ग्रँडमास्टर बनली, तेव्हा दिव्या अवघ्या तीन वर्षांची होती. आज त्याच हंपीला हरवून तिने मिळवलेले हे यश भारतीय बुद्धिबळासाठी एक सुवर्णक्षण आहे.
अभूतपूर्व विजयानंतर चॅम्पियन ग्रँडमास्टर दिव्या देशमुखला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्हिडिओ कॉल करून अभिनंदन केले. "फक्त १९ वर्षांच्या वयात, तिने भारताची ८८ वी ग्रँडमास्टर आणि हे प्रतिष्ठित विजेतेपद जिंकणारी पहिली भारतीय महिला म्हणून इतिहासात आपले नाव कोरले आहे. नागपूरच्या चैतन्यशील गल्लींपासून ते जागतिक बुद्धिबळ क्षेत्रापर्यंतचा तिचा प्रवास प्रतिभा, दृढनिश्चय आणि अथक परिश्रमाचे प्रतीक आहे," असे मुख्यमंत्री फडणवीस यांनी सांगितले.