नवी दिल्ली: शिवसेनेसह राष्ट्रवादी काँग्रेस आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी गुरूवारी (दि.३) सर्वोच्च न्यायालयात होणार होती. मात्र ज्या खंडपीठासमोर हे प्रकरण आहे त्या सरन्यायाधीशांच्या खंडपीठाने काही कारणास्तव गुरुवारची सर्व प्रकरणे १५ ऑक्टोबरला ऐकणार असल्याचे सांगितले. त्यामुळे गुरूवारीही या प्रकरणावर सुनावणी होऊ शकली नाही. आता यावर १५ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. दरम्यान, मंगळवारीही (१ ऑक्टोबर) हे प्रकरण न्यायालयाच्या पटलावर होते मात्र तेव्हाही ते सुनावणीपर्यंत न पोहोचल्याने सुनावणी होऊ शकली नाही.
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभुमीवर आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी कधी होते, याकडे राजकीय पक्षांसह राज्यातील जनतेची नजर आहे. दरम्यान, सप्टेंबर महिन्यात हे प्रकरण ८ दिवस न्यायालयात सूचीबद्ध करण्यात आले होते. मात्र, एकाही दिवशी यावर सुनावणी होऊ शकली नाही. ऑक्टोबर महिन्यात आतापर्यंत दोन दिवस हे प्रकरण सूचीबद्ध केले होते. मात्र या दोन दिवशीही सुनावणी होऊ शकली नाही.
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष नाव आणि चिन्ह प्रकरणाची सुनावणी येत्या १५ ऑगस्टला सर्वोच्च न्यायालयात होणार आहे. सोबतच नागालँडमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रता प्रकरणाची सुनावणी देखील ६ ऑगस्टलाच होणार आहे. न्यायाधीश सूर्यकांत आणि न्यायाधीश उज्जल भुयान यांच्या खंडपीठांसमोर ही सुनावणी होईल.
तसेच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नाव आणि चिन्ह प्रकरणात ज्येष्ठ वकील डॉ. अभिषेक मनु सिंघवी यांनी शरद पवार गटाच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात अंतरिम अर्ज नमुद केला होता. यामध्ये अजित पवार यांना देण्यात आलेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे घड्याळ चिन्हाऐवजी विधानसभा निवडणुकीच्या अगोदर नवे चिन्ह देण्यात यावे, अशी मागणी केली आहे. या अर्जावरही १५ ऑक्टोबरला सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र तेव्हापर्यंत राज्यात आचारसंहिता लागली असण्याची शक्यता आहे. जर तेव्हापर्यंत आचारसंहिता लागली तर मात्र यावर सुनावणी होणार का, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.