नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीत एका भारतीय भाषेचे संमेलन आयोजित करणे हे मोठे आव्हान असते, संयोजकांनी हे आव्हान यशस्वी पेलले आहे. मात्र संमेलनाच्या कार्यक्रम पत्रिकेत साहित्य केंद्रस्थानी दिसत नाही. मूळ साहित्यावर चर्चा व्हायला हवी. असे असले तरी साहित्य संमेलन झालेच पाहिजेत आणि त्याला अधिक लोकाश्रय मिळावा, अशी अपेक्षा ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी पुढारीशी बोलताना व्यक्त केली.
राजधानी दिल्लीत ९८ वे अ. भा. मराठी साहित्य संमेलन सुरू आहे. अनेक साहित्यिक इथे आले आहेत. दरम्यान ज्येष्ठ साहित्यिक सुनीलकुमार लवटे यांनी पुढारीशी विशेष संवाद साधला. सुनीलकुमार लवटे म्हणाले की, संमेलनात भारतभारतातून वाचक आला आहे. कुठल्याही आयोजनात चुका काढणे सोपे असते मात्र काम करणे अवघड आहे. साहित्य संमेलनात अनेक कार्यक्रम, उपक्रम आहेत मात्र या सगळ्यात साहित्य संमेलनाचे मूळ स्वर हरवल्यासारखे वाटते, असेही ते म्हणाले.
सुनीलकुमार लवटे म्हणाले की, साहित्य संमेलनात एकूण सहभाग पाहता साहित्य संमेलन कोणाचे आहे, असा प्रश्न पडतो मात्र कुठल्याही गोष्टीकडे नकारात्मक पद्धतीने बघू नये, काम केले तर चुका होतात आणि चुका सुधारल्या जाऊ शकतात. अनेक अर्थांनी साहित्य संमेलन महत्वाचे असते त्यामुळे साहित्य संमेलने झाली पाहिजेत. यानिमित्ताने चर्चा होते, साहित्यविषयक खरेदी होते. वाचन संस्कृती अधिक प्रभावीपणे रुजावी ही आपली अपेक्षा असते. साहित्य संमलेनाच्या या माध्यमातून यासाठीही काम होते, असेही ते म्हणाले.
साहित्य संमेलनाच्या आयोजनात शासनाबरोबर वाचक, साहित्यप्रेमी, मराठी भाषिकांनी आर्थिक योगदान देत राहिले पाहिजे. यात सामुदायिक सहभाग असला पाहिजे, संयोजकानी तसे आवाहन करावे, यामुळे संमेलनाला मदत होईल आणि आता जो लोकाश्रय आहे, त्यापेक्षा अधिक चांगला लोकाश्रय संमेलनाला मिळू शकतो. साहित्य संमेलनाची सुरुवात लोकाश्रयातून झाली. शासकीय मदत हा भाग खूप कालावधी नंतर आला. अलीकडच्या काळात संमेलने शासनाकडे मदतीसाठी बघतात, शासन मदतही करते मात्र त्यामुळे शासनावर बोलता येत नाही, संमलेनाचा आत्मसवर त्यामुळे हरवतो. हा गमावलेला स्वर मिळवण्याचा प्रयत्न केला पाहिजे. साहित्य क्षेत्रात काम करत असलेल्या अनेक संस्थांना सामावून घरातले पाहिजे, कुठलेही साहित्य संमलेन या सर्व गोष्टींसह आणखी व्यापक केले पाहिजे ही भावना व्यक्त करताना आजही संमेलन चांगले होत आहे. पुढच्या काळात आणखी चांगली संमेलने होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.