राष्ट्रीय

PM Narendra Modi : ‘निष्पापांच्या रक्तावर काँग्रेसचे राजकारण’, पीएम मोदींनी संसदेतच काढले वाभाडे

लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर निवेदन देताना पंतप्रधानांनी भारताच्या नव्या आणि कणखर परराष्ट्र धोरणाचे चित्र स्पष्ट केले.

रणजित गायकवाड

discussion on operation sindoor in parliament pm narendra modi

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’च्या यशावर बोलताना पाकिस्तानला अत्यंत सडेतोड आणि थेट इशारा दिला आहे. भारताने पाकिस्तानच्या अणुबॉम्बच्या धमक्या पोकळ ठरवल्या असून, यापुढे असे ब्लॅकमेलिंग खपवून घेतले जाणार नाही, असे त्यांनी ठामपणे सांगितले. या कारवाईत पाकिस्तानचे मोठे नुकसान झाले असून, त्यांचे अनेक हवाई तळ आजही ‘ICU’ मध्ये असल्याची महत्त्वपूर्ण माहिती त्यांनी दिली.

लोकसभेत 'ऑपरेशन सिंदूर'वर निवेदन देताना पंतप्रधानांनी भारताच्या नव्या आणि कणखर परराष्ट्र धोरणाचे चित्र स्पष्ट केले. "भारताने हे सिद्ध केले आहे की अणुबॉम्बचे ब्लॅकमेलिंग आता चालणार नाही आणि भारत अशा धमक्यांपुढे कधीही झुकणार नाही," असे त्यांनी निक्षून सांगितले.

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेस पक्षावर अत्यंत गंभीर आणि थेट शब्दांत टीका केली आहे. पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यासारख्या संवेदनशील प्रसंगी काँग्रेस पक्ष जबाबदारीने वागण्याऐवजी 'बालिशपणा' करत होता आणि निष्पापांच्या हत्येवर राजकारण करत होता, असा घणाघाती आरोप पंतप्रधानांनी केला.

संसदेत निवेदन देताना पंतप्रधान मोदी म्हणाले, ‘पहलगाम येथील दहशतवादी हल्ल्यानंतर काँग्रेस पक्ष केवळ आनंद लुटत होता. देशावर आलेल्या संकटाचे गांभीर्य ओळखण्याऐवजी, निष्पाप नागरिकांच्या हत्येवर काँग्रेसकडून राजकारण केले जात होते.’

आपल्या भाषणात त्यांनी काँग्रेसच्या भूमिकेवर तीव्र नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, ‘काँग्रेसचा हा निव्वळ बालिशपणा होता.’ अशा राष्ट्रीय संकटाच्या वेळी संपूर्ण देशाने एकत्र येणे अपेक्षित असताना, विरोधी पक्षाकडून केली जाणारी ही कृती अत्यंत खेदजनक असल्याचे पंतप्रधानांच्या विधानातून ध्वनित झाले.

दहशतवादी तळ जमीनदोस्त, हवाई तळांचे मोठे नुकसान

या कारवाईत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांचे कसे कंबरडे मोडले, याची माहिती देताना पंतप्रधान म्हणाले, "पाकिस्तानमधील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्यात आले. बहावलपूर, मुरिदके यांसारख्या ठिकाणी कोणी पोहोचू शकेल, याची कल्पनाही कोणी केली नव्हती. आपल्या सैन्याने ते तळ जमीनदोस्त केले."

ते पुढे म्हणाले, "पाकिस्तानच्या हवाई तळांचे आणि मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. आणि आजतागायत त्यांचे अनेक हवाई तळ ‘ICU’ मध्ये आहेत."

आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे जगाला दर्शन

या कारवाईने भारताची तांत्रिक क्षमता जगासमोर आणली आहे, असेही पंतप्रधानांनी नमूद केले. भारताच्या अचूक हल्ला करण्याच्या क्षमतेवर ते म्हणाले, "भारताने आपली तांत्रिक क्षमता दाखवून दिली आहे. पाकिस्तानच्या छातीवर अचूक हल्ला केला आहे."

तंत्रज्ञानावर आधारित युद्धाचे महत्त्व स्पष्ट करताना ते म्हणाले, "हे तंत्रज्ञानावर आधारित युद्धाचे युग आहे. गेल्या १० वर्षांत आपण जी तयारी केली, ती केली नसती, तर या युगात आपले किती नुकसान झाले असते, याची आपण कल्पना करू शकतो."

'ऑपरेशन सिंदूर' हे आत्मनिर्भर भारताच्या सामर्थ्याचे प्रतीक असल्याचे सांगत पंतप्रधान म्हणाले, "ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमातून, जगाने प्रथमच आत्मनिर्भर भारताचे सामर्थ्य ओळखले. मेड इन इंडिया ड्रोन आणि क्षेपणास्त्रांनी पाकिस्तानची शस्त्रप्रणाली उघडी पाडली," अशा शब्दांत त्यांनी स्वदेशी तंत्रज्ञानाचे महत्त्व अधोरेखित केले.

लोकसभेत ‘ऑपरेशन सिंदूर’वर झालेल्या चर्चेदरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या कारवाईचे वर्णन भारताचा ‘विजयोत्सव’ असे केले.

२२ मिनिटांत सूड, दहशतवाद्यांना सडेतोड उत्तर : पंतप्रधान मोदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सभागृहासमोर भारताची बाजू मांडताना ‘ऑपरेशन सिंदूर’मागील संपूर्ण घटनाक्रम सविस्तरपणे सांगितला.

ते म्हणाले, ‘२२ एप्रिल रोजी पहलगाममध्ये झालेली क्रूर घटना, जिथे दहशतवाद्यांनी निष्पाप लोकांना त्यांचा धर्म विचारून गोळ्या घातल्या, ती क्रूरतेची परिसीमा होती. भारताला हिंसाचाराच्या आगीत ढकलण्याचा हा एक सुनियोजित प्रयत्न होता. देशात दंगली घडवण्याचा हा कट होता. मी देशवासियांचे आभार मानतो की त्यांनी एकजुटीने तो कट उधळून लावला.’

कारवाईच्या निर्णयावर बोलताना पंतप्रधान म्हणाले, ‘२२ एप्रिल रोजी मी विदेशात होतो, मात्र घटनेची माहिती मिळताच मी तातडीने परतलो. परत येताच मी एक बैठक बोलावली आणि दहशतवादाला चोख प्रत्युत्तर द्यायचे, हा आमचा राष्ट्रीय संकल्प असल्याचे स्पष्ट निर्देश दिले. लष्कराला कारवाईसाठी पूर्ण मोकळीक देण्यात आली. कारवाई कधी, कुठे, कशी आणि कोणत्या पद्धतीने करायची, याचा निर्णय लष्करानेच घ्यावा, असे त्या बैठकीत स्पष्टपणे सांगण्यात आले होते.’

या कारवाईचे वर्णन करताना ते पुढे म्हणाले, ‘पहलगाम हल्ल्यानंतर भारताकडून मोठी कारवाई होईल, अशी कल्पना पाकिस्तानला होती. त्यांनी अणुबॉम्बच्या धमक्या देण्यास सुरुवात केली. मात्र, ६ आणि ७ मे च्या मध्यरात्री, ठरल्याप्रमाणे भारताने कारवाई केली आणि पाकिस्तान काहीही करू शकला नाही. आपल्या सशस्त्र दलांनी २२ एप्रिलच्या हल्ल्याचा बदला केवळ २२ मिनिटांत अचूक हल्ले करून घेतला.’

‘आम्हाला अभिमान आहे की दहशतवाद्यांना शिक्षा झाली; आणि अशी शिक्षा झाली की त्या दहशतवादी सूत्रधारांची झोप आजही उडालेली आहे. मी म्हटले होते की हे अधिवेशन भारताच्या 'विजयोत्सवा'चे आहे... आणि हा 'विजयोत्सव' म्हणजे दहशतवादी तळांना मातीत मिळवण्याचा आहे,’ असे पंतप्रधानांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT