Digital Gold file photo
राष्ट्रीय

Digital Gold: डिजिटल गोल्ड धोक्यात! सेबीच्या इशाऱ्यानंतर मोठी खळबळ, तुमच्या गुंतवणुकीचे काय होणार?

Digital Gold Investment SEBI Advisory : डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) या बाजार नियामक संस्थेने मोठा इशारा दिला आहे.

मोहन कारंडे

Digital Gold Investment SEBI Advisory

नवी दिल्ली : डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी ही महत्त्वाची बातमी आहे. सिक्युरिटीज अँड एक्सचेंज बोर्ड ऑफ इंडिया (SEBI) या बाजार नियामक संस्थेने नुकताच डिजिटल गोल्डपासून दूर राहण्याचा सल्ला गुंतवणूकदारांना दिला आहे. या उत्पादनाला कोणत्याही नियामक संस्थेचे संरक्षण नसल्यामुळे, संबंधित प्लॅटफॉर्मने दिवाळखोरी घोषित केल्यास, गुंतवणूकदारांचे पैसे बुडण्याची शक्यता आहे.

डिजिटल गोल्ड जे Paytm, Google Pay, PhonePe यांसारख्या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर विकले जाते, त्याला सेबीकडून सिक्युरिटी किंवा कमोडिटी डेरिव्हेटिव्ह मानले जात नाही. याचा अर्थ असा की, जर एखाद्या प्लॅटफॉर्मने (उदा. पेटीएम) दिवाळखोरी घोषित केली, तर सेबी गुंतवणूकदारांना कोणतेही संरक्षण देऊ शकणार नाही. भारतीय रिझर्व्ह बँक देखील याला बँकिंग किंवा ठेव उत्पादन मानत नाही, त्यामुळे यावर कोणाचेही नियंत्रण नाही. हा व्यवसाय सध्या प्लॅटफॉर्मच्या विश्वासावर चालू आहे.

ज्यांचे आधीच डिजिटल गोल्डमध्ये पैसे आहेत, त्यांनी काय करावे?

सेबीच्या इशाऱ्यानंतर ज्या लोकांनी आधीच डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक केली आहे, त्यांच्या मनात अनेक प्रश्न आहेत. घाबरून जाण्याचे कारण नाही, पण सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे. तुम्ही तुमच्या डिजिटल गोल्डची फिजिकल डिलिव्हरी म्हणजे प्रत्यक्ष सोन्याच्या स्वरूपात ते घेऊ शकता किंवा तुम्ही ते विकून टाका आणि त्याऐवजी सेबी किंवा आरबीआयद्वारे नियमन केलेल्या इतर पर्यायांमध्ये (उदा. SGB, Gold ETF) गुंतवणूक करू शकता. जर तुम्हाला प्लॅटफॉर्मवर पूर्ण विश्वास असेल, तर तुम्ही ते ठेवू शकता, पण भविष्यात काही अडचण आल्यास संपूर्ण जोखीम तुमची असेल.

सेबीच्या इशाऱ्यानंतर विक्रीमध्ये मोठी घट

सेबीच्या इशाऱ्यानंतर लोकांनी डिजिटल गोल्डपासून दूर राहायला सुरुवात केली आहे. नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) च्या आकडेवारीनुसार, ऑक्टोबर महिन्यात UPI द्वारे होणाऱ्या डिजिटल गोल्डच्या खरेदीत तब्बल 61% ची मोठी घट झाली आहे. सप्टेंबरमध्ये 1,410 कोटींचे डिजिटल गोल्ड विकले गेले, तर ऑक्टोबरमध्ये हा आकडा फक्त 550 कोटींवर आला. हे या वर्षातील सर्वात कमी प्रमाण आहे.

डिजिटल गोल्ड म्हणजे काय आणि भारतात कसे सुरू झाले?

डिजिटल गोल्ड हे सोन्याचे डिजिटल रूप आहे. तुम्ही ॲप्सद्वारे ते खरेदी करता आणि कंपनी तेवढेच प्रत्यक्ष सोने आपल्या तिजोरीत सुरक्षित ठेवते. तुम्ही ते SIP प्रमाणे हप्त्यांमध्येही खरेदी करू शकता. 2012 मध्ये ऑगमॉन्ट कंपनीने भारतात याची सुरुवात केली. लोकांना कमी किमतीत सोने खरेदी करणे सोपे जावे म्हणून 1 रूपयांपासून खरेदीची सोय उपलब्ध केली. त्यानंतर MMTC-PAMP (जे सरकारी MMTC आणि स्विस MKS PAMP चा संयुक्त प्रकल्प आहे) बाजारात आले. त्यांनी Paytm, PhonePe यांसारख्या कंपन्यांशी भागीदारी केल्यामुळे ते खूप लोकप्रिय झाले.

डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करण्यापूर्वी हे लक्षात ठेवा

  • या गुंतवणुकीत असलेल्या धोक्यांची माहिती घ्या.

  • तुम्ही ज्या ॲप किंवा प्लॅटफॉर्मवरून खरेदी करत आहात, त्याचे नियम आणि अटी काळजीपूर्वक वाचा.

  • प्लॅटफॉर्म किती विश्वसनीय आहे, हे तपासा.

  • शक्य असल्यास, SEBI किंवा RBI ने मान्यता दिलेल्या वेबसाइट्स किंवा उत्पादनांमधूनच सोने खरेदी करा.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT