Brain Cancer Treatment | आहारातील बदल करतात मेंदूच्या कर्करोगावरील उपचारास मदत Pudhari File Photo
राष्ट्रीय

Brain Cancer Treatment | आहारातील बदल करतात मेंदूच्या कर्करोगावरील उपचारास मदत

पुढारी वृत्तसेवा

वॉशिंग्टन : ग्लायोब्लास्टोमा हा एक अत्यंत प्राणघातक ब्रेन ट्यूमर आहे. या आजाराचे निदान झालेल्या बहुतेक रुग्णांचे आयुष्य फक्त एक ते दोन वर्षांपर्यंतच मर्यादित असते. या ट्यूमरमध्ये मेंदूतील सामान्य पेशी आक्रमक होतात, वेगाने वाढतात आणि आसपासच्या उतींवर हल्ला करतात.

‘नेचर’ जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या एका अभ्यासानुसार, मिशिगन विद्यापीठाच्या संशोधकांनी ग्लायोब्लास्टोमा ट्यूमरमधील पेशी ग्लुकोजचा वापर कसा करतात, याचा अभ्यास केला. त्यांनी शोधून काढले की, मेंदूच्या ट्यूमरमध्ये विशिष्ट पोषक तत्त्वांचा वापर वेगवेगळ्या प्रकारे होतो. संशोधनाचे सहलेखक, डॉ. डॅनियल वाल्ह म्हणाले, ‘आम्ही उंदरांमध्ये आहारामध्ये बदल करून या ट्यूमरची वाढ लक्षणीयरीत्या कमी करू शकलो.’ ते पुढे म्हणाले, ‘आमच्या या अभ्यासातून नजीकच्या भविष्यात रुग्णांसाठी नवीन उपचार पद्धती तयार करण्यास मदत होऊ शकते.’

सध्याच्या उपचार पद्धतींमध्ये शस्त्रक्रिया, त्यानंतर रेडिएशन आणि केमोथेरपी यांचा समावेश आहे. परंतु, कालांतराने ट्यूमर पुन्हा वाढतात आणि उपचारांना प्रतिरोधक बनतात. संशोधकांनी यापूर्वी दाखवून दिले आहे की, पेशींच्या चयापचय क्रियेमध्ये बदल झाल्यामुळे ट्यूमर उपचारांना प्रतिरोधक बनतात. चयापचय क्रिया म्हणजे शरीरात कर्बोदके आणि प्रथिने यांसारख्या रेणूंचे विघटन होण्याची प्रक्रिया, ज्यामुळे पेशी त्यांचा ऊर्जा म्हणून वापर करू शकतात किंवा नवीन रेणू तयार करू शकतात. मेंदू आणि कर्करोगाच्या पेशी दोन्ही साखरेवर अवलंबून असल्या, तरी त्या साखरेचा वापर वेगवेगळ्या प्रकारे करतात का, हे तपासण्याचा प्रयत्न या टीमने केला.

यासाठी त्यांनी उंदरांमध्ये आणि ब्रेन ट्यूमर असलेल्या रुग्णांमध्ये कमी प्रमाणात विशिष्ट साखर इंजेक्ट केली, जेणेकरून त्याचा वापर कसा होतो हे समजून घेता येईल. या संशोधनाचे सहलेखक, डॉ. वाजद अल-होलू म्हणाले, ‘या ब्रेन कॅन्सरला खर्‍या अर्थाने समजून घेण्यासाठी आणि रुग्णांवरील उपचार सुधारण्यासाठी, आम्हाला फक्त प्रयोगशाळेतच नाही, तर रुग्णांच्या ट्यूमरचाही अभ्यास करण्याची गरज होती. ‘या संशोधनामध्ये असे दिसून आले की, सामान्य आणि ट्यूमर पेशी दोन्ही जास्त साखर वापरतात.

परंतु, त्या वेगवेगळ्या कामांसाठी वापरल्या जातात. संशोधक अँड्र्यू स्कॉट यांच्या मते, ‘सामान्य मेंदू साखरेचा वापर ऊर्जा निर्मिती आणि विचार करण्यासाठी आवश्यक असणार्‍या न्यूरोट्रांसमीटरसाठी करतो. तर ट्यूमर पेशी त्याच साखरेचा वापर अधिक कर्करोगाच्या पेशी तयार करण्यासाठी करतात. ‘या अभ्यासानुसार, निरोगी उती साखरेचा उपयोग ऊर्जा निर्माण करण्यासाठी आणि मेंदूला योग्यरीत्या कार्य करण्यास मदत करणार्‍या रसायनांची निर्मिती करण्यासाठी करतात. याउलट, ग्लायोब्लास्टोमा साखरेचा उपयोग ‘डीएनए’ आणि ‘आरएनए’ चे बिल्डिंग ब्लॉक्स असलेल्या न्यूक्लियोटाईडस्सारख्या रेणूंमध्ये रूपांतरित करतात, ज्यामुळे त्यांना वाढण्यास आणि आसपासच्या उतींवर हल्ला करण्यास मदत होते.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT