Sonia Gandhi Autobiography Row Pudhari
राष्ट्रीय

Sonia Gandhi Book: सोनिया गांधींच्या आत्मचरित्रावरून खळबळ! ‘एडिटोरियल बदल’ नाकारताच पेंग्विनची माघार? प्रकाशकाचा मोठा खुलासा

Sonia Gandhi Autobiography Row: सोनिया गांधी यांच्या ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रावरून वाद निर्माण झाला आहे.

Rahul Shelke

Sonia Gandhi Autobiography Row: काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं आगामी आत्मचरित्र ‘Belonging: A Journey of Love’ वरून नवा वाद निर्माण झाला आहे. पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने शुक्रवारी स्पष्ट केले की, भारतामध्ये या पुस्तकाचा प्रकाशक पेंग्विन रँडम हाऊस इंडिया नाही. काही आठवड्यांपूर्वी या पुस्तकातील संपादकीय बदलांना सोनिया गांधी यांनी नकार दिल्यानंतर पेंग्विनने प्रकाशनातून माघार घेतल्याचा दावा एका मीडिया रिपोर्टमध्ये करण्यात आला होता. मात्र, कंपनीने हा दावा फेटाळून लावत आपली भूमिका स्पष्ट केली आहे.

अमेरिकेतील प्रकाशक अल्फ्रेड ए. नॉफ यांनी यापूर्वी सोनिया गांधी यांचे हे आत्मचरित्र 10 नोव्हेंबर रोजी प्रकाशित होणार असल्याची घोषणा केली होती. त्यानंतर भारतातील या पुस्तकाच्या प्रकाशन आणि वितरणाबाबत सातत्याने चर्चा सुरू आहे.

पेंग्विनची भूमिका काय?

पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, कंपनीने हे पुस्तक प्रकाशित करण्याबाबत रस दाखवला होता आणि ते प्रकाशित करण्याची त्यांची तयारीही होती. मात्र, लेखकाने पुस्तकातील काही बदल स्वीकारण्यास नकार दिल्यामुळे कंपनीने प्रकाशनातून हात आखडता घेतल्याचा दावा चुकीचा असल्याचे कंपनीने स्पष्ट केले.

प्रकाशन प्रक्रियेत लेखकाने दिलेल्या माहितीची तथ्य पडताळणी करणे आणि आवश्यक त्या सूचना करणे हा प्रक्रियेचा भाग असतो, असेही कंपनीने म्हटले आहे. हे प्रकाशकाचे केवळ अधिकारच नव्हे, तर जबाबदारीही असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. लेखकासोबत झालेल्या गोपनीय चर्चेवर अधिक भाष्य करण्यास कंपनीने नकार दिला आहे.

भारतात पुस्तक कोण वितरित करणार?

दरम्यान, भारतात या पुस्तकाचे प्रकाशन किंवा वितरण नेमके कोण करणार, याबाबत अद्याप स्पष्टता नाही. मात्र, ऑनलाइन शॉपिंग प्लॅटफॉर्मवर या पुस्तकाची ई-बुक आवृत्ती 2,615 रुपयांना प्री-ऑर्डरसाठी उपलब्ध असल्याचे दिसत आहे.

माहितीनुसार, या ई-बुकचा प्रकाशक William Collins असून तो HarperCollins UK चा भाग आहे. अल्फ्रेड ए. नॉफ यांनी पुस्तकाच्या प्रकाशनाची घोषणा केल्यापासून भारतातील त्याच्या प्रकाशनाबाबत विविध चर्चांना उधाण आले आहे.

वैयक्तिक आयुष्यापासून राजकारणापर्यंतचा प्रवास

79 वर्षीय सोनिया गांधी या भारतीय राजकारणातील सर्वाधिक चर्चेत राहिलेल्या व्यक्तिमत्त्वांपैकी एक आहेत. ‘Belonging: A Journey of Love’ या आत्मचरित्रातून त्या आपल्या वैयक्तिक आयुष्यातील अनेक महत्त्वपूर्ण प्रसंग उलगडणार असल्याचे सांगितले जात आहे.

इटलीतील बालपण, भारतात येण्यामागची प्रेमकहाणी, शक्तिशाली राजकीय कुटुंबात झालेला विवाह, पती आणि माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या निधनानंतरचा काळ आणि त्यानंतर राजकारणात झालेला प्रवेश, तसेच 2004 मध्ये पंतप्रधानपद स्वीकारण्यास दिलेला नकार अशा अनेक महत्त्वाच्या घटनांचा या पुस्तकात समावेश असणार आहे.

प्रकाशकाच्या माहितीनुसार, सोनिया गांधी यांच्या आयुष्यातील प्रेम, वैयक्तिक संघर्ष आणि आयुष्याला पूर्णपणे बदलून टाकणाऱ्या शोकांतिकांपासून ते भारतीय राजकारणातील त्यांच्या प्रवासापर्यंतचा पट या पुस्तकातून वाचकांसमोर येणार आहे.

गौरव गोगोईंचा पेंग्विनच्या निवेदनावर निशाणा

या संपूर्ण वादावर काँग्रेस खासदार गौरव गोगोई यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. सोनिया गांधी यांच्या पुस्तकासंदर्भात पेंग्विन रँडम हाऊस इंडियाने दिलेले स्पष्टीकरण त्यांनी “कमकुवत निवेदन” असल्याचे म्हटले आहे.

गोगोई यांनी आरोप केला की, पेंग्विन इंडियाला ‘Exam Warriors’ आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित अनेक पुस्तके प्रकाशित करण्यात कोणतीही अडचण येत नाही. मात्र, आता भाजप सरकारमधील काही लोकांना भारतातील नागरिकांनी काही पुस्तके वाचावीत, याचीच भीती वाटू लागली असल्याचा आरोप त्यांनी केला.

सोनिया गांधी यांच्या आत्मचरित्राच्या प्रकाशनावरून निर्माण झालेला हा वाद आता अधिक रंगण्याची शक्यता असून, भारतामध्ये हे पुस्तक नेमके कोणत्या प्रकाशकाकडून आणि कोणत्या माध्यमातून उपलब्ध होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT