नवी दिल्ली : देशातील असंसर्गजन्य रोगांचे (एनसीडी) वाढते प्रमाण लक्षात घेऊन केंद्र सरकारने विशेष अभियान सुरु केले आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने गुरुवारपासून या विशेष अभियानाची सुरुवात केली आहे. या अंतर्गत घरोघरी जाऊन असंसर्गजन्य रोगांची मोफत तपासणी ३१ मार्च २०२५ पर्यंत करण्यात येणार आहे.
३० वर्ष आणि त्यापेक्षा अधिक वयाच्या सर्व व्यक्तींसाठी मधुमेह, उच्च रक्तदाब आणि मौखिक, स्तन आणि गर्भाशयाच्या मुखाचा कर्करोग असे तीन कर्करोग यासह प्रचलित असंसर्गजन्य रोगांची १०० टक्के तपासणी करण्यात येणार आहे. या अभियानामुळे आरोग्यसेवेवरचा खर्च कमी होईल आणि देशभरातील लोकांच्या जीवनाचा एकूण दर्जा सुधारेल अशी अपेक्षा केंद्र सरकारला आहे.
या राष्ट्रीय अभियानाअंतर्गत देशभरातील आयुष्मान आरोग्य मंदिरे आणि विविध आरोग्य सुविधांद्वारे, अशा असंसर्गजन्य रोगांच्या प्रतिबंधासाठी आणि नियंत्रणासाठी ही मोहीम राबविण्यात येणार आहे.
• घरोघरी पोहोचणे: प्रशिक्षित आशा कामगार, परिचारिका आणि इतर कर्मचारी घरोघरी जाऊन प्राथमिक चाचणी करतील.
• अत्यावश्यक पुरवठा: राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश सर्व आरोग्य सेवा केंद्रांवर रक्तदाब मॉनिटर्स, ग्लुकोमीटर आणि आवश्यक औषधांसह आवश्यक वैद्यकीय सुविधांचा पुरवठा उपलब्ध करुन देतील.
•प्रत्यक्ष देखरेख (रिअल-टाइम मॉनिटरिंग): या मोहिमेची पारदर्शकतेसाठी प्राथमिक तपासणी, उपचार आणि फॉलो-अप्स यांची माहिती दररोज एनपी-एनसीडी पोर्टलवर अपलोड केली जाईल.
• बहु-स्तरीय समन्वय: मोहिमेच्या विना व्यत्यय अंमलबजावणीसाठी, तालुका, जिल्हा आणि राज्य स्तरावर सुविधा केंद्रांवर नोडल अधिकारी नियुक्त केले जातील.
• दैनंदिन आढावा: प्रत्येक राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, केंद्रीय मंत्रालयाला दररोज संध्याकाळी ६ वाजेपर्यंत दिवसभरातील घडामोडींची अद्ययावत माहिती देतील,ज्यामुळे सतत देखरेख ठेवून तांत्रिक सहाय्य मिळू शकेल.
सर्व लोकांपर्यंत पोहोचणे ,असंसर्गजन्य रोगांची लक्षणे लवकरात लवकर शोधणे आणि वेळेवर उपाययोजना करणे हे या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने म्हटले आहे.