Dharmasthala Secret Burials
धर्मस्थळ : कर्नाटकमधील धर्मस्थळ परिसरात लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांचे मृतदेह गुप्तपणे पुरण्यात आल्याच्या धक्कादायक प्रकरणात आता नव्या वळणाने खळबळ उडवली आहे. याच प्रकरणावर आधारित एक व्हिडीओ तयार करून खोटी माहिती पसरवल्याच्या आरोपावरून प्रसिद्ध कन्नड युट्यूबर समीअर एमडी याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
“Who Are Serial K!llrs of Dharmasthala?” असे शीर्षक असलेला २३ मिनिटे ५२ सेकंदांचा हा व्हिडिओ शनिवारी युट्यूबवर अपलोड केल्यापासून ३१ लाख लोकांनी पाहिला आहे. हा व्हिडीओ आर्टिफिशियल इंटेलिजन्स (AI) च्या मदतीने तयार करण्यात आला असून त्यात गुप्त पुराव्यांबाबत बनावट माहिती देण्यात आल्याचे दक्षिण कन्नड पोलिसांनी म्हटले आहे. या व्हिडिओमध्ये तक्रारदाराने अधिकृत तक्रारीत दिलेल्या माहितीच्या आणि न्यायालयात जबाब नोंदवताना दिलेल्या माहितीच्या पलीकडे जाऊन काही गोष्टी सांगितल्या आहेत. या व्हिडीओमुळे गैरसमज पसरवले गेले असून, या प्रकरणातील तक्रारदाराबाबत काही संवेदनशील माहिती देखील उघड झाली आहे, असे पोलिसांनी म्हटले आहे.
धर्मस्थळ मंदिर परिसरात पूर्वी काम करणाऱ्या एका माजी सफाई कामगाराने पोलिसांकडे केलेल्या तक्रारीत गंभीर आरोप केले होते. त्याने सांगितले की, त्याच्याकडून लैंगिक अत्याचार झालेल्या पीडितांचे मृतदेह दबावाखाली पुरण्यात आले. तसेच हे प्रकरण कोणालाही सांगितल्यास गंभीर परिणाम भोगावे लागतील, अशी धमकी त्याला देण्यात आली होती. तो दहा वर्षांपूर्वी धर्मस्थळ सोडून पळून गेला होता, मात्र आता मनातल्या अपराधगंडामुळे परत येऊन पोलिसांत तक्रार दाखल केली. या तक्रारीच्या अनुषंगाने सुरू असलेल्या चौकशीदरम्यानच युट्यूबर समीअरने हे व्हिडीओ अपलोड केले.
दंगल घडवण्याच्या उद्देशाने जाणीवपूर्वक चिथावणी देणे आणि गुन्ह्याबद्दल खोटी माहिती देणे यांसारख्या आरोपांखाली धर्मस्थळ पोलीस ठाण्यात समीर एमडी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी एप्रिल महिन्यात, १४ वर्षांपूर्वी झालेल्या एका महाविद्यालयीन विद्यार्थिनीच्या न उलगडलेल्या खून प्रकरणावरील त्याच्या व्हिडिओमुळे, बंगळूरु न्यायालयाने समीर एमडीला १० कोटी रुपयांच्या मानहानीच्या दाव्यावर नोटीस बजावली होती. हा खटला श्री क्षेत्र धर्मस्थळचे प्रतिनिधी डी. हर्षेंद्र कुमार आणि निश्चल डी. यांनी दाखल केला होता. समीरने आपल्या बदनामीकारक मजकुराद्वारे धार्मिक संस्थेला लक्ष्य केले होते, असा आरोप त्यांनी केला होता.