मंगळूर; वृत्तसंस्था : संपूर्ण कर्नाटक राज्याला हादरवून सोडणार्या धर्मस्थळ सामूहिक हत्या प्रकरणाच्या तपासाला विशेष तपास पथकाने (एसआयटी) वेग दिला आहे. या प्रकरणातील मुख्य साक्षीदार आणि तक्रारदार असलेल्या व्यक्तीचा जबाब शनिवारी नोंदवण्यात आला असून, या चौकशीतून अनेक धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
राज्य सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीच्या अधिकार्यांनी शुक्रवारी मंगळूरमध्ये दाखल होऊन या प्रकरणाची सूत्रे हाती घेतली. डीआयजी एम. एन. अनुचेथ आणि एसपी जितेंद्रकुमार दायमा यांनी दक्षिण कन्नड पोलिसांकडून या प्रकरणाची सर्व कागदपत्रे अधिकृतरीत्या ताब्यात घेतली. शनिवारी सकाळी 11 वाजता साक्षीदार-तक्रारदार आपल्या वकिलांसह एसआयटी कार्यालयात हजर झाला आणि संध्याकाळपर्यंत त्याचा सविस्तर जबाब नोंदवण्यात आला. तपासाच्या सोयीसाठी बेळतंगडी येथे एसआयटीचे एक स्वतंत्र कार्यालय आणि एक हेल्पलाईन क्रमांक सुरू केली जाणार असल्याचेही अधिकार्यांनी सांगितले.
या प्रकरणातील तक्रारदार हा पूर्वी स्वच्छता कर्मचारी म्हणून काम करत होता. धर्मस्थळ आणि आसपासच्या परिसरात बलात्कार आणि हत्येला बळी पडलेल्या व्यक्तींचे मृतदेह पुरण्यासाठी आपल्याला धमकावण्यात आले होते, असा गंभीर आरोप त्याने आपल्या तक्रारीत केला आहे. या तक्रारीनंतर 4 जुलै रोजी धर्मस्थळ पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन, कर्नाटक राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा नागलक्ष्मी चौधरी यांच्या पत्रानंतर राज्य सरकारने 19 जुलै रोजी एसआयटी स्थापन करण्याचा निर्णय घेतला. या उच्चस्तरीय चौकशीमुळे आता अनेक वर्षांपासून दडपल्या गेलेल्या सत्याचा उलगडा होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.