मंत्री धनंजय मुंडे (source- @dhananjay_munde)
राष्ट्रीय

'जर मी दोषी असेल तर मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागावा'; धनंजय मुंडे दिल्ली दौऱ्यात काय म्हणाले?

Dhananjay Munde | धनंजय मुंडे यांनी दिल्लीत घेतली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

पुढारी वृत्तसेवा

पुढारी ऑनलाईन डेस्क : बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हत्या (Santosh Deshmukh Murder Case) प्रकरणातील संशयित आरोपी वाल्मीक कराड (Walmik Karad) आणि मंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांचे जवळचे संबंध असल्याचा आरोप करत मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीने जोर धरला आहे. ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही नुकतीच उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भेट घेत धनंजय मुंडे यांच्याबाबतची काही कागदपत्रे त्यांना दिली होती. या पार्श्वभूमीवर अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.

''मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांना जर मी कुठे दोषी वाटत असेल तर त्यांनी राजीनामा मागावा, मी राजीनामा देणार. मी दोषी आहे का? हे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री सांगू शकतील.'' असे मुंडे यांनी दिल्लीत पत्रकारांशी बोलताना सांगितले.

सरपंच संतोष देशमुख यांची निर्घृण हत्या झाली. या प्रकरणी जे कोणी दोषी आहेत त्यांना त्यांना फासावर चढवा, अशी आपली मागणी असल्याचेही मुंडे म्हणाले.

धनंजय मुंडेंनी घेतली केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट

धनंजय मुंडे यांनी आज केंद्रीय ग्राहक व्यवहार, अन्न आणि सार्वजनिक वितरण मंत्री प्रल्हाद जोशी यांची भेट घेतली. या भेटीत केवळ अन्न नागरी पुरवठ्याशी संबंधित समस्येवर चर्चा झाल्याचे मुंडे यांनी स्पष्ट केले. केंद्रीय मंत्री प्रल्हाद जोशी यांची आज नवी दिल्ली येथे त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी खात्यातील विविध अडचणींबाबत केंद्राच्या आवश्यक मदतीच्या दृष्टीने सकारात्मक चर्चा झाली. तसेच विभागाचे कामकाज अधिक प्रभावीपणे करण्याबाबत जोशी यांचे मार्गदर्शन मिळाल्याचे मुंडे यांनी सांगितले.

मुंडेंच्या राजीनाम्यासाठी दिला ९६ तासांचा अल्टिमेटम

वाल्मीक कराड आणि धनंजय मुंडे कसे एकत्र आहेत? त्यांचे व्यवहार कसे एकत्र आहेत? याचे पुरावे घेऊन धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी अजित पवारांना भेटल्याचे दमानिया यांनी नुकतेच म्हटले होते. धनंजय मुंडे यांचा चार दिवसांत राजीनामा घेतला नाही तर न्यायालयात जाणार असल्याचे त्यांनी सांगितले आहे. त्यासाठी ९६ तासांचा अल्टिमेटम दिला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT