नवी दिल्ली : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यावर होते. या दौऱ्यादरम्यान त्यांनी केंद्रीय गृहमंत्री मंत्री अमित शाह, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय आरोग्य मंत्री आणि भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन, केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चव्हाण, केंद्रीय नगर विकास मंत्री मनोहरलाल खट्टर या नेत्यांच्या भेटी घेतल्या.
दरम्यान, या सर्व भेटींमध्ये अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबत राज्यातील राजकीय विषयांवर चर्चा झाल्याची समजते. त्यामुळे पुढच्या काही दिवसांमध्ये महाराष्ट्र मंत्रिमंडळात काही मंत्र्यांची अदलाबदल दिसण्याची शक्यता आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बहुतांश भेटी शासकीय कामानिमित्त होत्या. मात्र अमित शाह आणि जे. पी. नड्डा यांच्यासोबतची भेट ही राजकीय असल्याचे समजते. महाराष्ट्राच्या राजकारणाबद्दल दोन्ही नेत्यांसोबत देवेंद्र फडणवीस यांनी स्वतंत्रपणे वन-टू-वन प्रत्येकी २० मिनिटे चर्चा केली. विशेष म्हणजे या चर्चा बंदद्वार झाल्या आणि चर्चेदरम्यान देवेंद्र फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, जे. पी. नड्डा यांच्या व्यतिरिक्त कोणीही नव्हते. एकीकडे राज्यात युती सरकारमध्ये सर्वकाही आलबेल असल्याचे सांगितले जात आहे.
मात्र राज्यातील मंत्री माणिकराव कोकाटे, संजय शिरसाट यांच्या वक्तव्यामुळे आणि वागणुकीमुळे सामान्य लोकांच्या मनात रोष तयार झाला आहे, थोड्याच दिवसात राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका होत आहेत. त्यामुळे राज्य मंत्रिमंडळासह राज्यातील राजकीय परिस्थितीवर चर्चा झाली असून तसा निर्णय मुख्यमंत्र्यांकडून काही दिवसांमध्ये घेतला जाऊ शकतो. तसेच पुढच्या काही दिवसांमध्ये भाजपचे नवे राष्ट्रीय अध्यक्ष निवडले जाणार आहेत. देशाच्या उपराष्ट्रपतींची निवड होणार आहे, या सर्व पार्श्वभूमीवरही या दोन्ही बैठका महत्त्वाच्या मानल्या जातात.
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनीही गुरुवारी रात्री मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. या भेटीतही राज्यातील विविध विषयांवर चर्चा झाली. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, महायुती सरकारमध्ये कोणत्या मंत्र्यांना ठेवायचे किंवा त्यांच्याबद्दलचा निर्णय काय घ्यायचा यावर त्या पक्षाचे प्रमुख नेते निर्णय घेतील. मात्र माणिकराव कोकाटे यांचे खाते काढून दुसऱ्या मंत्र्यांकडे ते खाते दिले जाण्याची दाट शक्यता आहे. त्यामुळे महाराष्ट्र मंत्रिमंडळात लवकरच खात्यांची अदलाबदल होण्याची दाट शक्यता आहे. असे असले तरीही कोकाटेंचे मंत्रीपद मात्र शाबूत आहे, असेच दिसते. दरम्यान, सुनिल तटकरे मुख्यमंत्र्यांना भेटायला आले असताना ते अजित पवारांचा निरोप घेऊन मुख्यमंत्र्यांच्या भेटीला आल्याच्या चर्चा दिल्लीत होत्या.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ३ दिवसांच्या दिल्ली दौऱ्यादरम्यान राष्ट्रीय मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहिर, खासदार सुनील तटकरे, आमदार सत्यजित तांबे, पानिपत शौर्य स्मारक ट्रस्टचे अध्यक्ष प्रदीप पाटील यांनी इतर अभ्यागतांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतली. दौऱ्याच्या तिसऱ्या दिवशी शनिवारी मुख्यमंत्री केंद्रीय मंत्र्यांना भेटण्यासाठी संसदेत आले होते. यावेळी संसद परिसरात केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्यासह भाजपच्या सर्व खासदारांनीही त्यांची भेट घेतली. या सर्व भेटीगाठींसह अनेक शासकीय कामेही मुख्यमंत्र्यांनी हाताळली.