दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन केले. Image Source X
राष्ट्रीय

विकसित भारतासाठी भारतीय रेल्वेचा विकास महत्त्वाचा : पंतप्रधान

PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते विविध रेल्वे प्रकल्पांचे उद्घाटन

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : २०१४ पर्यंत देशात केवळ ३५ टक्के रेल्वेचे विद्युतीकरण झाले होते. मात्र आता देशात जवळजवळ १०० टक्के रेल्वेचे विद्युतीकरण झाले आहे. विकसित भारत निर्माण करण्याच्या संकल्पात भारतीय रेल्वेचा विकास महत्त्वाचा आहे आणि भारतात पहिली बुलेट ट्रेन धावेल तो दिवस दूर नाही, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले. तसेच श्री गुरु गोविंद सिंह यांच्या जयंतीनिमित्त पंतप्रधानांनी शुभेच्छा दिल्या आणि गुरु गोविंद सिंहांची शिकवण आणि जीवन, सशक्त आणि समृद्ध राष्ट्राच्या संकल्पनेला प्रेरणा देत असल्याचे ते म्हणाले.

जम्मू काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांमधील विविध रेल्वे प्रकल्पांच्या पायाभरणी आणि उद्घाटन प्रसंगी पंतप्रधान नरेंद्र मोदी बोलत होते. दिल्लीतून दूरदृश्य प्रणालीद्वारे त्यांनी या कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी पंतप्रधानांनी नवीन जम्मू रेल्वे विभागाचे उद्घाटन केले तसेच रेल्वेच्या रायगडा रेल्वे विभागाच्या इमारतीची पायाभरणी केली आणि तेलंगणातील चारलापल्ली येथील नवीन टर्मिनल स्थानकाचे उद्घाटन केले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, २०२५ च्या सुरुवातीला भारत १ हजार किलोमीटरपेक्षा जास्त मेट्रो रेल्वे जाळ्याचा विस्तार करून आपल्या विविध उपक्रमांना गती देत आहे. जम्मू काश्मीर, तेलंगणा आणि ओडिशा राज्यांमध्ये सुरू करण्यात आलेल्या प्रकल्पांमुळे देशाच्या उत्तर, पूर्व आणि दक्षिणेकडच्या भागात आधुनिक कनेक्टिव्हिटीमध्ये एक मोठी झेप घेतली आहे. ‘सबका साथ, सबका विकास’ हा मंत्र विकसित भारताचे स्वप्न प्रत्यक्षात आणण्यास मदत करत असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.

भारतातील रेल्वेचा विकास चार निकषांवर पुढे नेत आहोत- पंतप्रधान

· रेल्वेच्या पायाभूत सुविधांचे आधुनिकीकरण

· रेल्वे प्रवाशांसाठी आधुनिक सुविधा

· देशाच्या कानाकोपऱ्यात रेल्वे कनेक्टिव्हिटी

· रोजगार निर्माण करण्यासाठी, उद्योगांना पाठबळ देण्यासाठी रेल्वे

पंतप्रधान म्हणाले की, देशभरात फ्रेट कॉरिडॉरसारख्या आधुनिक रेल्वे जाळे विस्तारण्याचे काम वेगाने सुरू आहे. अशा विशेष कॉरिडॉरमुळे नियमित रेल्वेमार्गावरचा ताण कमी होतो आणि जलदगती रेल्वेगाड्यांसाठी अधिक संधी निर्माण होत आहेत.

पंतप्रधान म्हणाले की, रेल्वेविषयक पायाभूत सेवा सुविधांमध्ये जम्मू- काश्मीर नवीन टप्पे गाठत आहे. उधमपूर-श्रीनगर-बारामुल्ला रेल्वे मार्गाविषयी संपूर्ण देशभरात चर्चा आहे. चिनाब या जगातील सर्वाधिक उंचीवर असलेल्या रेल्वे सेतूच्या निर्मितीमुळे हा प्रदेश उर्वरित भारताशी जोडण्यात महत्वाची भूमिका बजावेल आणि लेह लडाख मधील लोकांना सुविधा मिळताल, असेही पंतप्रधान म्हणाले.

ओडीशाला विपुल नैसर्गिक संसाधने आणि मोठा समुद्र किनारा लाभला आहे. ओडीशात आंतरराष्ट्रीय व्यापाराची मोठी क्षमता आहे. ओडीशात ७० हजार कोटींहून अधिक किमतीचे विविध रेल्वे प्रकल्प सुरू आहेत. ७ गती शक्ती कार्गो टर्मिनल्सच्या स्थापनेचे काम सुरू आहे. यामुळे ओडीशातील व्यापार आणि उद्योगाला चालना मिळेल असा विश्वास पंतप्रधानांनी व्यक्त केला. ओडिशातील रायगडा रेल्वे विभागाच्या पायाभरणीमुळे दक्षिण ओडिशामध्ये पर्यटन, व्यवसाय आणि रोजगाराला चालना देणारी रेल्वेसेवा अधिक मजबूत होईल, असेही पंतप्रधान म्हणाले. तर तेलंगणातील चारलापल्ली नवीन टर्मिनल स्थानक सर्व आधुनिक सुविधांनी सुसज्ज आहे.

स्‍थानकासाठी ४१३ कोटी रुपये निधी खर्च करण्यात आला आहे. या स्थानकामुळे सिकंदराबाद, हैदराबाद आणि काचीगुडा येथील सध्याच्या स्थानकांवरचा ओझे कमी होईल. भारतात सर्व प्रकारच्या पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणात विस्तार होत आहे, असेही ते म्हणाले. २०१४ मध्ये देशात विमानतळांची संख्या ७४ होती, ती आज १५० झाली आहे. मेट्रो सेवा ५ शहरांवरून २१ शहरात विस्तारली आहे, असेही पंतप्रधानांनी सांगितले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT