Kolkata Delivery Agent Harassment Pudhari
राष्ट्रीय

Delivery Boy Video: डिलिव्हरी बॉयचे अश्लील हावभाव; ज्या महिलेची छेड काढली ती निघाली पोलीस, कॉलर पकडून थेट पोलीस ठाण्यात नेलं

Kolkata Delivery Agent Harassment: कोलकात्यात एका डिलिव्हरी एजंटने स्कूटीवरून जाणाऱ्या महिलेशी अश्लील वर्तन केल्याप्रकरणी त्याला संबंधित महिलेने थेट गळ्याला धरून पोलीस ठाण्यात नेले.

पुढारी वृत्तसेवा

Kolkata Delivery Agent Harassment: पश्चिम बंगालमधील कोलकात्यात एका डिलिव्हरी एजंटला महिलेशी अश्लील वर्तन करणे चांगलेच महागात पडले. स्कूटीवरून जात असलेल्या महिलेला अश्लील हावभाव करणे, अश्लील टिप्पणी करणे आणि तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न करणाऱ्या डिलिव्हरी एजंटला संबंधित महिलेने थेट गळ्याला धरून पोलीस ठाण्यात नेले.

त्यानंतर आरोपीला तात्काळ अटक करण्यात आली. विशेष म्हणजे, ती महिला सामान्य नागरिक नसून, साध्या वेशातील एक महिला पोलीस असल्याचे नंतर समोर आले.

ही घटना 13 जुलै 2026 रोजी कोलकात्यातील खर्डा परिसरात घडली. प्राथमिक माहितीनुसार, महिला स्कूटीवरून घरी जात असताना एका डिलिव्हरी एजंटने तिच्या शेजारी येत अश्लील हावभाव केले. तसेच तिला उद्देशून आक्षेपार्ह टिप्पणीही केली. महिला घाबरेल आणि आपण सहज निसटून जाऊ, असा आरोपीचा समज होता.

मात्र, उलटच घडलं. महिलेने तत्काळ त्याची मोटारसायकल अडवली, स्कूटी थांबवली आणि आरोपीच्या शर्टाच्या कॉलरला पकडून त्याला जागेवरच जाब विचारला. त्यानंतर त्याला सोडून न देता थेट पोलीस ठाण्यात नेलं.

पोलीस ठाण्यात पोहोचल्यानंतर आरोपीची ओळख आकाश घोष अशी पटली. त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. संबंधित डिलिव्हरी कंपनीनेही या घटनेची गंभीर दखल घेत 'झिरो टॉलरन्स' धोरणाअंतर्गत त्याला कामावरुन काढून टाकलं.

या महिलेच्या धाडसी कृतीचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी कौतुक केले असून, तिच्या प्रसंगावधानाचे आणि निर्भीड भूमिकेचे कौतुक केले आहे.

मात्र, या घटनेने महिलांच्या सुरक्षेबाबत गंभीर प्रश्नही उपस्थित केले आहेत. कारण काही दिवसांपूर्वीच बंगळुरूमध्ये एका डिलिव्हरी एजंटने डिलिव्हरीच्या बहाण्याने एका महिलेच्या घरात प्रवेश करून तिच्यासमोर अश्लील कृत्य केल्याची घटना घडली होती. या दोन घटनांमुळे महिलांच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT