Delhi crime news
नवी दिल्ली : गेल्या वर्षी नेटफ्लिक्सवर हसीन दिलरुबा हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. पत्नीचे विवाहबाह्य संबंध आणि यातून घडणारे गुन्हे असे या चित्रपटाचे कथानक होते. अशाच एखाद्या वेबसीरिज अथवा चित्रपटाची कथा वाटावी अशी घटना दिल्लीत घडली. यात दुर्दैवी बाब एकच होती की पडद्यावर घडणाऱ्या गुन्ह्यात कोणाचा बळी जात नाही पण खऱ्या आयुष्यात एका मृत्यूमुळे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. पत्नीचे विवाहबाह्य संबंधांची माहिती मिळताच संतापलेल्या पतीने पत्नीच्या प्रियकराचा काटा काढला खरा पण यात त्याने चक्क पत्नीचीच मदत घेतली. गुन्हा उलगडा झाल्यावर पोलिसही हादरले होते.
काय आहे प्रकरण?
अरुण मेहतो (वय २४) मृत व्यावसायिकाचे नाव असून तो बिहारच्या पाटणा येथे कुटुंबासोबत राहत होता. तिथे तो अॅल्युमिनियमचे दुकान चालवत होता. १६ मे रोजी व्यवसायानिमित्त तो दिल्लीला आला आणि नातेवाईक नवीनच्या मैदान गढी येथील घरी थांबला होता. २१ मे रोजी रात्री १० वाजता अरुण मेहतो बेपत्ता झाल्याची तक्रार त्याचा भाऊ अनिल कुमारने पोलिसांत दिली. भावाने पोलिसांना सांगितले की, अरूण १६ मे रोजी दिल्लीत आला होता आणि तो शेवटचा १८ मे रोजी रात्री ११ वाजता कुटुंबियांशी बोलला. तेव्हापासून त्याचा फोन बंद आहे. त्यानंतर २३ मे रोजी मैदान गढी तलावाजवळील जंगलात एक कुजलेला मृतदेह आढळला. तो मृतदेह अरूण मेहतोचा असल्याची स्पष्ट झाले आणि मिसिंगची तक्रार आता खुनाचा गुन्हा ठरली होती.
पोलिस तपासात काय समोर आले?
पोलिस उपायुक्त अंकित चौहान यांनी अतिरिक्त डीसीपी अचिन गर्ग, पोलिस निरीक्षक (मैदान गढी) अमित कुमार यांच्या नेतृत्वाखाली एक पथक स्थापन केले. या पथकाने मोबाईल लोकेशन, कॉल रेकॉर्ड या आधारे तपासाला सुरूवात केली. दुसरीकडे अरूणने त्याच्या भावाला शेवटच्या कॉलमध्ये तो नवीनसोबत आहे, असे सांगितले होते. पोलिसांची एक टीम त्यावरही काम करत होती. पोलिसांनी नवीन आणि इतर नातेवाईकांची चौकशी केली. चौकशीत अरूणचे मैदान गढी येथेच राहणाऱ्या नवीनच्या मावशीशी अनैतिक संबंध होते, अशी माहिती मिळाली.
खूनाचा रचला कट
त्यानुसार पोलिसांनी संबंधीत २४ वर्षीय महिला आणि तिचा पती सुषील कुमार यांना ताब्यात घेतले. ते दोघेही मजुरी करतात. पोलिसी खाक्या दाखवताच सुशीलने या गुन्ह्याची कबूली दिली. त्याने पोलिसांना सांगितले की, १८ मे रोजी त्याला पत्नीच्या फोनवर अनेक मिस्ड कॉल्स दिसले. तो नंबर अरूण मेहतोचा असल्याचे त्याच्या लक्षात आले. रात्री उशिरा आलेल्या फोन कॉल्समुळे पत्नीवर संशय आल्याने तिला याबाबत विचारले. पत्नीने प्रेमसंबंध असल्याचे कबुल केले. संतापलेल्या सुशीलने मेहतोला संपवण्याचा निर्णय घेतला. त्याने पत्नीला मेहतो याला जंगलात बोलावण्यास सांगितले. त्यानुसार तिने मेहतोला जंगलात यायला सांगितले. तिथे आल्यावर सुशीलने त्याच्या डोक्यावर मागून लोखंडी रॉडने वार केले. यात त्याचा मृत्यू झाला.
नातेवाईकाच्या लग्नात झाली ओळख
महिलेने सांगितले की, ते दोन वर्षांपूर्वी बिहारमधील एका नातेवाईकाच्या लग्नात भेटले होते. तेव्हापासून दोघेजण संपर्कात होते. सुशील हा गेल्या १७-१८ वर्षांपासून दिल्लीत राहतो. सुशील आणि त्याच्या २४ वर्षीय पत्नीला चार मुले आहेत. पोलिसांनी फुटलेला मोबाईल फोन, चेकबुक, गुन्ह्यात वापरलेला रक्ताने माखलेला लोखंडी रॉड आणि हत्येच्या वेळी आरोपीने घातलेले कपडे यासह महत्त्वाचे पुरावे जप्त केले आहेत.