Delhi Satya Niketan Building Collapse Video Pudhari
राष्ट्रीय

Delhi Building Collapse Video: दिल्ली हादरली! पाच मजली इमारत पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली; थरकाप उडवणारा VIDEO समोर

Delhi Satya Niketan Building Collapse Video: दिल्लीतील सत्य निकेतन परिसरात पाच मजली जीर्ण इमारत अचानक कोसळून मोठी दुर्घटना घडली. या घटनेत 6 जणांचा मृत्यू आणि 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे.

Rahul Shelke

Delhi Satya Niketan Building Collapse Video: दिल्ली विद्यापीठाच्या (DU) साऊथ कॅम्पसजवळील सत्य निकेतन परिसरात रविवारी दुपारी एक मोठी दुर्घटना घडली. अरुंद गल्लीत असलेली सुमारे 30 वर्षे जुनी आणि जीर्ण पाच मजली इमारत अचानक पत्त्याच्या बंगल्यासारखी कोसळली. या इमारतीत मुलांसाठी पेइंग गेस्ट (PG) सुरू होते. दुर्घटनेत आतापर्यंत 6 जणांचा मृत्यू, तर 8 जण जखमी झाल्याची माहिती आहे. ढिगाऱ्याखाली आणखी काही जण अडकले असण्याची शक्यता असून बचावकार्य युद्धपातळीवर सुरू आहे.

या दुर्घटनेचा सीसीटीव्ही व्हिडिओ समोर आला असून, काही क्षणांतच संपूर्ण इमारत कोसळल्याचे त्यात दिसत आहे. हा व्हिडिओ पाहिल्यानंतर दुर्घटनेची भीषणता जाणवते.

सत्य निकेतन परिसरात देशाच्या विविध भागांतून दिल्ली विद्यापीठात शिक्षणासाठी येणारे विद्यार्थी मोठ्या संख्येने PGमध्ये राहतात. मात्र, परिसरातील अनेक इमारतींच्या बांधकामास तसेच त्यांचा PG म्हणून वापर करण्यास आवश्यक परवानग्या आहेत का, याबाबत प्रश्न उपस्थित झाले आहेत. विद्यार्थ्यांकडून जास्त भाडे घेतले जाते; मात्र त्यांच्या सुरक्षेची पुरेशी काळजी घेतली जाते का, हा गंभीर मुद्दा या दुर्घटनेनंतर पुन्हा ऐरणीवर आला आहे.

दुर्घटनेची माहिती मिळताच विद्यार्थ्यांच्या कुटुंबीयांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले. अनेक पालक आपल्या मुलांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत होते. राजधानी दिल्लीतच अशा प्रकारची दुर्घटना घडल्याने प्रशासनाच्या कार्यपद्धतीवर आणि नागरिकांच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

इमारत मालकाविरोधात मनुष्यवधाचा गुन्हा

दिल्ली पोलिसांनी या प्रकरणी साऊथ कॅम्पस पोलीस ठाण्यात इमारत मालक हरिराम याच्यासह इतर संबंधितांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, इमारतीच्या देखभालीत निष्काळजीपणा आणि नागरिकांच्या जीविताला धोका निर्माण केल्याच्या आरोपांखाली ही कारवाई करण्यात आली आहे.

पोलिसांच्या प्राथमिक माहितीनुसार, इमारतीच्या तळमजल्यावर दुरुस्तीचे काम सुरू होते. या कामामुळे इमारतीच्या संरचनेवर परिणाम होऊन ती कोसळल्याचा संशय व्यक्त करण्यात आला आहे. आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी अनेक पथके तैनात केली आहेत.

बचावकार्यात स्थानिक नागरिकांचाही सहभाग

इमारत कोसळल्यानंतर बचाव पथके घटनास्थळी दाखल झाली. ठिगारा हटवून अडकलेल्या नागरिकांचा शोध घेत असताना स्थानिक नागरिक आणि प्रत्यक्षदर्शींनीही बचावकार्यात मदत केली. उपलब्ध साधनांचा वापर करत त्यांनी ठिगाऱ्याखाली अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्याचा प्रयत्न केला.

NDRFच्या दोन पथकांसह सुमारे 70 जवान, डॉग स्क्वॉड आणि इतर बचाव पथके घटनास्थळी तैनात करण्यात आली. दिल्ली पोलीस, दिल्ली अग्निशमन सेवा, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण (DDMA), दिल्ली महापालिका, कॅट आणि नागरी संरक्षण दलाच्या पथकांकडूनही मदतकार्य सुरू होते.

ठिगाऱ्याखाली अडकलेल्यांसाठी ऑक्सिजन सिलिंडर

ठिगाऱ्याखाली अडकलेल्या व्यक्तींना श्वास घेण्यास अडचण येऊ नये यासाठी बचाव पथकांनी ऑक्सिजन सिलिंडर आत पोहोचवले. जीवित व्यक्तींचा शोध घेण्यासाठी डॉग स्क्वॉडचीही मदत घेण्यात आली. घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्याही तैनात करण्यात आल्या आहेत.

ठिगाऱ्याखालून फोन करून मदतीची मागणी

या दुर्घटनेनंतर समोर आलेल्या काही व्हिडिओ आणि प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार, ठिगाऱ्याखाली अडकलेल्या काही विद्यार्थ्यांनी मोबाइल फोनवरून बाहेरील लोकांशी संपर्क साधून मदतीची मागणी केली. त्यामुळे बचाव पथकांनी मलब्यातून येणारे आवाज आणि फोनच्या माध्यमातून मिळणाऱ्या माहितीनुसार अडकलेल्या व्यक्तींचा शोध घेण्याचा प्रयत्न केला.

दरम्यान, दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी या दुर्घटनेची चौकशी करण्याचे आदेश दिले आहेत. या दुर्घटनेमागील नेमके कारण, इमारतीची स्थिती आणि बांधकाम तसेच दुरुस्तीच्या कामासाठी आवश्यक परवानग्या होत्या का, याची चौकशी केली जाणार आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT