Delhi Car Blast i20:
दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात जवळपास ८ लोकांचा मृत्यू झाला असून त्यात २० जण जखमी झाले आहेत. देशाची राजधानीत हा स्पोट झाल्यानं याभोवती मोठं संशयाचं वातावरण आहे. हा एक दहशतवादी हल्ला असण्याची शक्यता आहे. या घटनाक्रमात एक म्हत्वाचा फॅक्टर म्हणजे हा स्फोट ज्या गाडीत झाला ती i20 गाडी! दिल्ली पोलीस आणि इतर सुरक्षा दलांनी देखील आपल्या तपासाची दिशा या गाडीच्या भोवतीच ठेवली होती. या i20 गाडीचा तपास करताना त्यांच्या हाती अनेक महत्वाचे धागेदोरे सापडले आहेत.
दिल्ली कार स्फोटातील i20 ही हरियाणा पासिंगची गाडी असून तिचा नंबर HR26CE7674 असा आहे. तिचे उत्पादन २०१३ मध्ये झाले होते. ही गाडी २०१४ मध्ये सलमान नावाच्या व्यक्तीवर रजिस्टर झाली होती. तो या गाडीचा दुसरा मालक आहे. नोंदणी कागदावरून सलमान हा गुरूग्रामचा रहिवासी असल्याचं कळंतय.
ज्यावेळी पोलिसांनी सलामनला दिल्ली लाल किल्ला स्फोट प्रकरणी ताब्यात घेतलं त्यावेळी त्यानं ही गाडी ओखला येथील देवेंद्र नामक व्यक्तीला विकल्याचं सांगितलं. देवेंद्रनं देखील ही गाडी अंबाला येथील एका व्यक्तीला विकली. त्या व्यक्तीनं ही गाडी नंतर जम्मू काश्मीरच्या पुलवामा इथल्या आमिर याला विकल्याचं तपासात आढळून आलं आहे.
आमिरकडं ही i20 गाडी आल्यानंतर ती गाडी डॉक्टर उमर मोहम्मद याच्याकडं आली. तो फरीदाबादच्या अल-फलाह विद्यापीठात काम करत होता. ज्यावेळी i20 कारमध्ये ब्लास्ट झाला त्यावेळी गाडी डॉक्टर उमर मोहम्मदच चालवत असल्याचा संशय आहे. तपास यंत्रणा ही आत्मघातकी हल्ला असू शकतो का या अनुषंगानं देखील तपास करत आहेत.
दिल्ली स्फोटातील ही i20 जरी अनेक माणसांकडे फिरली असली तरी त्याचा कागदोपत्री मालक एकच आहे. तो व्यक्ती म्हणजे सलमान! जरी ही गाडी अनेक राज्य फिरली असली तरी त्याचा मालक एकच राहिला. जुन्या गाड्यांची खरेदी विक्री करणाऱ्या व्यवसायातील जाणकारांनी सांगितलं की ही गोष्ट फार वगेळी आहे असं नाही. अनेकवेळा गाडी ही बिना नोंदणी करताच खरेदी अन् विक्री केली जाते. हे कागदपत्रांचा खर्च वाचवण्यासाठी केलं जातं.
ज्यांना गुन्हा करायचा आहे ते कागदपत्र क्लिअर नसलेली गाडी शोधत असतात. त्यामुळं गुन्हेगारांचा माग काढणं कठीण होतं. जुन्या गाड्यांचे व्यवहार करणाऱ्या व्यक्ती पैसे वाचवण्यासाठी ही कट प्रॅक्टिस अवलंबतात. मात्र त्यामुळं जर अशी गाडी एखाद्या गुन्ह्यात वापरली गेली तर तपास यंत्रणा थेट त्या गाडीच्या मूळ मालकापर्यंत पोहचतात.
तपासात ही आय २० गाडी नेताजी सुभाष मार्गावरील सिग्लनवर पोहचण्यापूर्वी कुठं कुठं गेली होती हे उघड झालं आहे. आतापर्यंतच्या तपासात असं दिसून आलं आहे की या i20 गाडीनं फरीदाबादपासून आपला प्रवास सुरू केला होता. त्यानंतर ही गाडी बद्रापूर बॉर्डर क्रॉस करून राजधानी दिल्लीत दाखल झाली. त्यानंतर ही गाडी सरई काले खान, ITO intersection असा प्रवास करत लाल किल्ल्याजवळील पार्किंग लॉटमध्ये पोहचली. हा पार्किंग लॉट लाल किल्ला मेट्रो स्टेशन परिसरात आहे.
सीसीटीव्ही फुटेजमध्ये ही कार पार्किंग लॉटमध्ये काल दुपारी ३.१९ वाजता दाखल झाली. त्यानंतर ती पुढचे ३ तास त्याच पार्किंग लॉटमध्ये होती. विशेष म्हणजे संपूर्ण तीन तास गाडीचा चालक गाडीतून उतरला देखील नव्हता. त्यानंतर जवळपास सायंकाळी ६.२८ च्या दरम्यान या कारनं पार्किंग लॉट सोडला. त्यानंतर ही गाडी ट्रॅफिक सिग्नलवर ६.५२ ला पोहचली त्यानंतर या गाडीत स्फोट झाला अन् आसपासच्या गाड्या देखील पेटल्या.