नवी दिल्ली ः लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटाची कसून चौकशी सुरू आहे. तथापि, एक महत्त्वाचा प्रश्न कायम आहे. तो म्हणजे निशाण्यावर कोण होते? लाल किल्ल्याजवळील सामान्य नागरिक, व्हीआयपी की संसद भवन? कारण घटना घडली तिथे सामान्य नागरिकांची वर्दळ असते. काही ‘व्हीआयपी’ची निवासस्थाने घटनास्थळापासून दूर नाहीत. तसेच संसद भवन देखील तिथून जवळ आहे. डॉ. मोहम्मद उमर नबी याच्या हालचालंवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत.
स्फोट झालेली कार सोमवारी सकाळी 8.04 वाजता बदरपूर सीमेवरून दिल्लीत दाखल झाली, हे आणखी महत्त्वाचे ठरते. दिवसभर गाडी कुठे गेली आणि 3.19 वाजता लाल किल्ल्याजवळ पार्क केल्यानंतर तीन तास गाडीत काय झाले, असे सवालही उपस्थित होत आहेत. बदरपूर सीमेवरून लाल किल्ल्याकडे गेलेली स्फोटकांनी भरलेली कार अनेक व्हीआयपी मार्गांजवळून जाते. या मार्गांमध्ये एका उच्चपदस्थ मंत्र्यांचे अधिकृत निवासस्थान आणि संसद समाविष्ट आहे. यामुळे लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात दुसऱ्या ठिकाणाला लक्ष्य केले असावे, अशी शक्यता निर्माण झाली आहे. त्यामुळे निशाणा इतरत्र होता का, असा प्रश्न पडणे स्वाभाविक आहे. घटनेच्या आधारे असे दिसून येते की, रेकी केल्यानंतर गाडी लाल किल्ल्याजवळ पार्क करण्यात आली होती. तपासकर्त्यांच्या मते, गाडी सुमारे तीन तास तिथेच उभी होती.
तपास अधिकाऱ्यांच्या मते, जप्त केलेली शस्त्रे आणि स्फोटके विविध स्रोतांकडून राजधानीत आली. डिलिव्हरीची सुविधा कोणी दिली आणि मोठे दहशतवादी नेटवर्क त्यात सामील होते का, हे तपासात निश्चित केले जात आहे. याखेरीज संशयितांनी वापरलेले टेलिग्राम ग्रुप आणि इतर संप्रेषण चॅनेल तपासले जात आहेत, जेणेकरून हे नेटवर्क किती काळापासून सक्रिय आहे आणि ते कोण चालवत आहे, हे उघड होईल. उमर, मुझम्मिल किंवा आदिल यांनी दिल्लीत स्वतः हेरगिरी केली की, त्यांनी इतरांची मदत घेतली हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. तपास अधिकारी संपूर्ण प्रकरण गांभीर्याने घेत आहेत आणि सखोल चौकशी करत आहेत.
उमरने पार्किंगमध्ये बसून सुमारे तीन तास वेळ घालवला, कोणाशी भेटला किंवा परिसराची रेकी केली काय, याचा तपास पोलिस करत आहेत. शिवाय त्याला कोणाकडून सूचना मिळाल्या की तो योग्य इशाऱ्याची वाट पाहात होता, यावर तपास अधिकाऱ्यांनी लक्ष केंद्रित केले आहे. तपासाचा आणखी एक पैलू फरिदाबादमधील एका विद्यापीठातील डॉक्टरांशी संबंधित आहे. त्यांची नावे या प्रकरणात समोर आली आहेत. पोलिस या नेटवर्कच्या सक्रिय आणि निष्क्रिय सदस्यांची माहिती घेत आहेत. दिल्ली बॉम्बस्फोट आणि फरिदाबादमधील जप्तीच्या घटनांमध्ये त्यांचा सहभाग होता का, याचा छडा लावण्यात येत आहे.