Delhi Red Fort Blast:
नवी दिल्ली: देशाची राजधानी दिल्ली सोमवारी संध्याकाळच्या वेळी भीषण स्फोटाने हादरली. लाल किल्ल्याजवळ झालेल्या या स्फोटाप्रकरणी पोलिसांनी आज (दि. ११) जम्मू आणि काश्मीरमधील पुलवामा येथून डॉ. सज्जाद अहमद नावाच्या व्यक्तीला ताब्यात घेतले आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, डॉ. सज्जाद अहमद हा स्फोटात स्वतःला उडवून देणाऱ्या डॉ. मोहम्मद उमरचा मित्र आहे.
सोमवारी संध्याकाळी लाल किल्ल्याजवळ झालेल्या स्फोटात वापरल्या जाणाऱ्या कारचा चालक कथितरित्या फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी संबंध होता. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी सांगितले की, पुलवामाचा रहिवासी असलेला आणि पेशाने डॉक्टर असलेला उमर मोहम्मद कथितरित्या ती ह्युंदाई आय २० कार चालवत होता, जी लाल किल्ला मेट्रो स्टेशनजवळील पार्किंगमध्ये झालेल्या स्फोटात वापरली गेली. प्राथमिक पोलीस तपासानुसार, स्फोटात अमोनियम नायट्रेट, इंधन तेल आणि डिटोनेटरचा वापर झाला असावा. दरम्यान, अंतिम अहवालाची प्रतीक्षा असल्याचे सूत्रांनी सांगितले.
दरम्यान, जम्मू आणि काश्मीर पोलिसांनी डॉ. उमर याचा साथीदार डॉ. सज्जाद अहमद याला चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. दिल्ली स्फोटात आतापर्यंत दहा जणांचा मृत्यू झाला आहे, तर २५ जण जखमी झाले आहेत.
स्फोटाच्या काही तास आधी, पोलिसांनी तीन डॉक्टरांसह आठ जणांना अटक करून दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश केला होता. तसेच २,९०० किलोग्राम स्फोटके जप्त केल्याचा दावा केला होता. फरीदाबादमध्ये जप्त केलेल्या स्फोटक साहित्यामध्ये अमोनियम नायट्रेट, पोटॅशियम नायट्रेट आणि सल्फरचा समावेश असल्याचे पोलिसांनी सांगितले.