राष्ट्रीय

Rahul Gandhi Protest : पंतप्रधान निवासाबाहेर आंदोलनाला बसलेल्या राहुल-प्रियंका गांधींना पोलिसांनी घेतले ताब्यात

प्रियंका गांधींचा तीव्र विरोध; महिला पोलिसांशी झटापट

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : पेपर लीक आणि 'नीट' (NEET) परीक्षेतील गैरव्यवहाराच्या मुद्द्यावरून केंद्र सरकारविरोधात आक्रमक झालेल्या विरोधकांनी थेट देशाच्या राजधानीत आंदोलन छेडले आहे. या आंदोलनादरम्यान दिल्लीतील वातावरण कमालीचे तापले असून, मंगळवारी (दि. २१) पंतप्रधान निवासस्थानासमोर धरणे आंदोलन करणाऱ्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव यांच्यासह प्रमुख नेत्यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.

केंद्र सरकारविरुद्ध जोरदार निदर्शने

काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्डे आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली खासदार आणि वरिष्ठ नेत्यांनी संसद भवनाबाहेरून मोर्चा काढत थेट पंतप्रधान निवासाकडे कूच केली. यावेळी 'इंडिया' आघाडीच्या घटक पक्षांचे नेतेही सहभागी झाले होते. समाजवादी पक्षाचे प्रमुख अखिलेश यादव हेदेखील आपल्या खासदारांसह राहुल गांधींच्या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी घटनास्थळी पोहोचले.

काँग्रेस कार्यकर्त्यांची गर्दी आणि सुरक्षा यंत्रणांचा फौजफाटा यामुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. सुरक्षेचा उपाय म्हणून दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई करत आधी राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांच्या सुरक्षा कर्मचाऱ्यांना आणि त्यानंतर अखिलेश यादव यांना ताब्यात घेतले.

प्रियंका गांधींचा तीव्र विरोध; महिला पोलिसांशी झटापट

प्रियंका गांधी वाड्रा यांना ताब्यात घेताना पोलिसांना मोठ्या कसरतीचा सामना करावा लागला. प्रियंका या पोलिस बसच्या प्रवेशद्वारावर उभ्या राहून केंद्र सरकारविरोधात घोषणाबाजी करत होत्या. महिला पोलिसांनी त्यांना बसच्या आत नेण्याचा प्रयत्न केला, मात्र त्या हटायला तयार नव्हत्या. अखेर तीन ते चार महिला पोलीस अधिकाऱ्यांनी त्यांना पकडून ताब्यात घेतले आणि बसमधून पोलीस ठाण्यात नेले.

यावेळी केंद्र सरकारवर जोरदार हल्लाबोल करताना प्रियंका गांधी म्हणाल्या, "हे सरकार भित्रे आहे. ते घाबरलेले आहेत, म्हणूनच दडपशाहीचा वापर करत आहेत. पण आम्ही त्यांना अजिबात घाबरत नाही."

'ही एका नव्या क्रांतीची सुरुवात' - काँग्रेसचा घणाघात

कारवाईनंतर आक्रमक झालेल्या काँग्रेसने सरकारवर निशाणा साधला आहे. काँग्रेस खासदार रणदीप सिंग सुरजेवाला यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले, "हा या आंदोलनाचा शेवट नसून राहुल गांधींच्या नेतृत्वाखालील एका नव्या क्रांतीची सुरुवात आहे. सरकार आम्हाला तुरुंगात टाकू शकते, आमच्यावर लाठीचार्ज करू शकते, गैरवर्तन करू शकते; परंतु पेपर लीकमुळे ज्या लाखो तरुण-तरुणींचे भविष्य उद्ध्वस्त झाले आहे, त्यांच्या प्रश्नांची उत्तरे पंतप्रधान मोदींना द्यावीच लागतील. ही क्रांती आता संपूर्ण देशात पसरणार आहे."

'राहुल गांधी शब्दावरून फिरले'; केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांचा आरोप

दरम्यान, केंद्र सरकारच्या वतीने केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म 'X' वर पोस्ट करत काँग्रेस आणि राहुल गांधी यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

केंद्रीय मंत्री जितेंद्र सिंह यांनी स्पष्ट केले की, विरोधी पक्षाचे नेते अचानक अकबर रोडजवळ रस्त्यावर आंदोलनाला बसले होते. वरिष्ठ नेत्यांची प्रतिष्ठा लक्षात घेऊन गृहसचिव गोविंद मोहन आणि मी स्वतः त्यांच्याशी चर्चा करण्यासाठी गेलो होतो. राहुल गांधी यांनी आधी मागणी केली होती की, जर सरकारने संसदेत NEET परीक्षेच्या मुद्द्यावर सविस्तर चर्चेची मागणी मान्य केली, तर ते तातडीने आंदोलन मागे घेतील.

"आम्ही सरकारच्या वरिष्ठ नेतृत्वाशी बोलून NEET विषयावर संसदेत सविस्तर चर्चा करण्याचे आश्वासन राहुल गांधींना दिले. मात्र, ही मागणी मान्य होताच राहुल गांधी आपल्या शब्दावरून फिरले. त्यांनी लगेचच केंद्रीय शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची दुसरी नवीन अट समोर ठेवली. जेव्हा त्यांना पूर्वकल्पना दिली की अशा प्रकारे भूमिकेपासून मागे हटणे एका वरिष्ठ नेत्याला शोभत नाही, तेव्हा 'ती माझी मर्जी आहे' असे बेजबाबदार उत्तर त्यांनी दिले," असा दावा जितेंद्र सिंह यांनी केला आहे.

सध्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीतील हाय-सिक्युरिटी झोनमध्ये मोठ्या प्रमाणावर बंदोबस्त तैनात करण्यात आला असून, ताब्यात घेतलेल्या काँग्रेस आणि विरोधी पक्षाच्या नेत्यांना वेगवेगळ्या पोलीस ठाण्यांमध्ये नेण्यात आले आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT