Shocking Crime News
नवी दिल्ली : हुंड्यासाठी एका दिल्ली पोलीस महिला कमांडोची तिच्या पतीने डंबेल्सने वार करून निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. काजल (वय २७) असे मृत विवाहितेचे नाव असून, त्या दिल्ली पोलिसांच्या विशेष कक्षाच्या 'स्वॅट' पथकात कार्यरत होत्या. विशेष म्हणजे, हत्येच्या वेळी काजल चार महिन्यांच्या गर्भवती होत्या.
काजल यांच्यावर जीवघेणा हल्ला मिळालेल्या माहितीनुसार, ही घटना २२ जानेवारी रोजी रात्री १० वाजेच्या सुमारास घडली. आरोपी पती अंकुर याने काजल यांच्यावर जीवघेणा हल्ला केला. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अंकुरने काजल यांचे डोके दरवाजावर आपटले आणि त्यानंतर डंबेल्सने त्यांच्या डोक्यावर प्रहार केले. या हल्ल्यात काजल गंभीर जखमी झाल्या होत्या. घटनेनंतर अंकुरनेच त्यांना दिल्लीतील मोहन गार्डन येथील तारक रुग्णालयात दाखल केले. मात्र, प्रकृती खालावल्याने त्यांना गाझियाबादमधील खासगी रुग्णालयात हलवण्यात आले. तिथे उपचार सुरू असताना मंगळवारी (२७ जानेवारी) त्यांचा मृत्यू झाला.
काजल यांच्या वडिलांनी संताप व्यक्त करताना म्हटले की, "माझी मुलगी चार महिन्यांची गर्भवती होती. अंकुरने केवळ माझ्या मुलीचीच नाही, तर जन्माला न आलेल्या बाळाचीही हत्या केली आहे. त्याने एक नव्हे तर दोन खून केले आहेत." काजल यांच्या माहेरच्यांनी आरोप केला आहे की, लग्नानंतर अवघ्या १५ दिवसांपासूनच अंकुर आणि त्याच्या कुटुंबीयांनी कार आणि हुंड्यासाठी काजल यांचा छळ सुरू केला होता.
काजल आणि अंकुर यांची ओळख २०२२ मध्ये झाली होती. ओळखीचे रूपांतर प्रेमात झाले आणि एका वर्षानंतर दोन्ही कुटुंबांच्या संमतीने त्यांचे लग्न झाले. २०२३ मध्ये काजल यांची दिल्ली पोलिसांच्या 'स्वॅट' कमांडो पदी निवड झाली, तर अंकुर संरक्षण मंत्रालयात लिपिक म्हणून कार्यरत होता. २०२४ मध्ये ते दिल्लीत वास्तव्यास आले, परंतु तिथेही हुंड्यासाठी मारहाण आणि छळ सुरूच होता.
हल्ला केल्यानंतर अंकुरने स्वतः काजल यांच्या भावाला फोन करून "मी तिला मारून टाकले आहे, तिचा मृतदेह घेऊन जा" असे सांगितले. याप्रकरणी पोलिसांनी अंकुरविरुद्ध हत्येचा गुन्हा दाखल करून त्याला अटक केली आहे. फॉरेन्सिक टीमला घटनास्थळी रक्ताने माखलेले डंबेल्स आणि दरवाजाच्या चौकटीवर रक्ताचे डाग आढळले आहेत.