CJP Protest Delhi: दिल्लीतील जंतर-मंतर येथे आज, १० ऑक्टोबर रोजी कॉकरोच जनता पार्टीच्या (CJP) आंदोलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या आंदोलनापूर्वी दिल्ली पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे. यूट्यूबर ध्रुव राठी यांच्यानंतर आता अभिजीत दिपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांनाही पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, अभिजीत दिपके, सौरभ दास आणि त्यांचे काही सहकारी दिल्ली विमानतळावर उतरल्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले. जंतर-मंतर येथे आंदोलनासाठी जाण्यापूर्वीच ही कारवाई करण्यात आली. दिल्ली पोलिसांच्या सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, विमानतळावर या सर्वांना नवी दिल्ली परिसरात जाऊ नका असे सांगण्यात आले होते. मात्र, त्यांनी पोलिसांचे म्हणणे ऐकले नाही. त्यानंतर पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले.
दरम्यान, यूट्यूबर ध्रुव राठी यांनाही गुरुग्राममध्ये पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती आहे. शनिवारी सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास ही कारवाई करण्यात आल्याचे सांगितले जात आहे. मात्र, त्यांना नेमक्या कोणत्या कारणामुळे ताब्यात घेण्यात आले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही.
गुरुवारी ध्रुव राठी बेंगळुरूमध्ये एसआयआरविरोधातील आंदोलनात सहभागी झाले होते. त्यानंतर शुक्रवारी त्यांनी इन्स्टाग्रामवर पोस्ट करत कॉकरोच जनता पार्टीच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते. केंद्र सरकारवर टीका करत त्यांनी लोकांना दिल्लीतील जंतर-मंतर येथे पोहोचून आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन केले होते.
आज होणाऱ्या CJP आंदोलनापूर्वी पोलिसांनी केलेल्या या कारवायांमुळे राजकीय आणि सामाजिक वर्तुळात चर्चेला सुरुवात झाली आहे. मात्र, ताब्यात घेतलेल्या व्यक्तींवरील कारवाईचे नेमके कारण अजून समजले नाही.