दिल्ली आणि राष्ट्रीय राजधानी क्षेत्र (NCR) मधील हवेची गुणवत्ता अत्यंत गंभीर पातळीवर पोहोचली आहे. या बिघडलेल्या स्थितीमुळे, सरकारने ग्रेड रिस्पॉन्स ॲक्शन प्लॅन (GRAP) चा चौथा टप्पा (GRAP 4) तातडीने लागू करण्याचा निर्णय घेतला आहे.
GRAP च्या चौथ्या टप्प्याची अंमलबजावणी सुरू झाल्याने दिल्लीतील सर्व प्रकारची बांधकामे थांबवण्यात येणार आहेत. तसेच दहावी आणि बारावीचे वर्ग वगळता, इतर सर्व शाळांचे ऑफलाईन वर्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दिल्ली आणि राज्य सरकार विद्यार्थ्यांना ऑनलाइन वर्ग घेण्याचा निर्णय घेऊ शकते.
आवश्यक वस्तू वाहून नेणारे आणि आवश्यक सेवांमध्ये सहभागी असलेले सीएनजी (CNG) आणि इलेक्ट्रिक ट्रक वगळता, इतर सर्व ट्रकच्या दिल्लीतील प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. केंद्र आणि राज्य सरकार आपल्या कर्मचाऱ्यांना परिस्थिती सुधारत नाही तोपर्यंत घरून काम (Work From Home) करण्याचा निर्णय घेण्याची शक्यता आहे. या कठोर उपायांमुळे दिल्ली-NCR मधील नागरिकांना काही गैरसोयींचा सामना करावा लागू शकतो, पण हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी हे पाऊल उचलणे आवश्यक आहे.