Delhi Crime News
दिल्ली : दिल्लीच्या नबी करीम भागात शनिवारी रात्री उशिरा एका भयानक घटनेत प्रेमसंबंधातील वादातून दोन व्यक्तींचा जीव गेला, तर एक गंभीर जखमी झाला आहे. या दुहेरी हत्याकांडामुळे परिसरात खळबळ उडाली असून पोलीस या प्रकरणाचा तपास करत आहेत.
नेमके काय घडले?
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, रात्री सुमारे सव्वा दहाच्या सुमारास ही घटना घडली. आकाश (वय २३) हा त्याची गर्भवती पत्नी शालिनी (वय २२) हिच्यासोबत तिच्या आईला भेटण्यासाठी कुतुब रोड, नबी करीम येथे आला होता. त्याचवेळी, शालिनीचा आधीचा प्रियकर आशु उर्फ शैलेंद्र (वय ३४) तिथे पोहोचला. आशुने सर्वप्रथम आकाशवर चाकूने हल्ला केला, मात्र आकाशने तो वार चुकवला. त्यानंतर, रिक्षात बसलेल्या शालिनीवर आशुने सपासप वार केले. पत्नीवर हल्ला होत असल्याचे पाहून आकाशने तिला वाचवण्यासाठी धाव घेतली. तेव्हा आशुने आकाशलाही चाकू मारला. यादरम्यान, आकाशने आशुला पकडले आणि त्याच्याकडून चाकू हिसकावून त्याच चाकूने आशुवर हल्ला केला.
दोन मृत, एकावर उपचार सुरू
यानंतर शालिनीचा भाऊ रोहित याने तातडीने शालिनी आणि आकाशला रुग्णालयात नेले. तर पोलिसांनी आशुला रुग्णालयात पोहोचवले. मात्र, उपचारादरम्यान डॉक्टरानी शालिनी आणि आशु या दोघांनाही मृत घोषित केले. शालिनीच्या पोटात बाळ होते, असेही सांगण्यात आले आहे. गंभीर जखमी झालेल्या आकाशवर सध्या उपचार सुरू आहेत.
नेमकं प्रकरण काय?
शालिनीची आई शीला यांनी पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार, शालिनी आणि आकाशचे लग्न झाले होते आणि त्यांना दोन मुलेही आहेत. मात्र, शालिनीचे आशुसोबत प्रेमसंबंध होते आणि ती काही काळ आशुसोबत 'लिव्ह-इन रिलेशनशिप'मध्ये राहिली होती. त्यानंतर तिने आकाशसोबत पुन्हा एकत्र येण्याचा निर्णय घेतला आणि आशुला सोडले. यामुळे आशु प्रचंड संतापलेला होता.
मिळालेल्या माहितीनुसार, आशु हा शालिनीच्या पोटात वाढत असलेल्या बाळाचा पिता आपणच आहोत, असा दावा करत होता, ज्यामुळे आकाश आणि आशु यांच्यात वाद झाला होता. आशु हा नबी करीम पोलीस ठाण्याच्या 'बी.सी.' यादीतील आरोपी होता, तर आकाशवरही तीन गुन्हे दाखल आहेत. मृत शालिनीच्या आईच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा नोंदवला आहे.