नवी दिल्ली : दिल्लीतील आम आदमी पक्षाच्या सरकारमधील मद्यधोरण गैरव्यवहाराची व्यापक चौकशी करण्याची मागणी काँग्रेसने केली आहे. तसेच यामध्ये भाजपचाही सहभाग असल्याचा आणि कॅगच्या अहवालातील अनेक महत्त्वाच्या प्रश्नांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप काँग्रेसने केला.
राजधानी दिल्लीतील काँग्रेस मुख्यालयात दिल्ली काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष देवेंद्र यादव आणि पक्षाचे ज्येष्ठ नेते संदीप दीक्षित यांनी पत्रकार परिषद घेतली. यामध्ये मद्यधोरण गैरव्यवहाराच्या चौकशीची व्याप्ती वाढवण्याची मागणी केली. काँग्रेसने भाजपविरुद्ध दिलेल्या लेखी तक्रारीचीही चौकशी झाली पाहिजे. यासोबतच मद्यधोरण गैरव्यवहाराची चर्चा सार्वजनिक व्यासपीठावर झाली पाहिजे. कॅग अहवालाची चौकशी करण्यासाठी लोकलेखा समितीची (पीएसी) लवकर स्थापना करण्याची मागणीही काँग्रेस नेत्यांनी केली.
देवेंद्र यादव म्हणाले की, दारू धोरणाशी संबंधित कॅगचा अहवाल विधानसभेत सादर करण्यात आला. या धोरणात अनेक अनियमितता असल्याचा काँग्रेसला आधीच संशय होता, ज्यामुळे सरकारच्या महसुलावर परिणाम होईल. दिल्ली काँग्रेसने मद्यधोरणाशी संबंधित एक लेखी तक्रार तपास यंत्रणांना दिली होती, ज्यामध्ये भाजपच्या सहभागाचे पुरावे देखील होते. कॅगच्या अहवालावरही यादव यांनी प्रश्न उपस्थित केले.
संदीप दीक्षित म्हणाले की, कॅगच्या अहवालानुसार मद्यधोरण ज्या उद्देशाने बनवले गेले होते ते वारंवार बदलले गेले. सुरुवातीला अधिकाधिक लोकांच्या सहभागाची चर्चा होती, सुरुवातीला ७७ लोकांचा सहभाग होता मात्र नंतर तो १४ पर्यंत कमी करण्यात आला. ही १४ लोक किंवा संस्था एकमेकांशी संबंधित आहेत. काही जण देशाच्या अशा भागातून येतात जिथे राजकारणी किंवा त्यांच्या कुटुंबातील सदस्यांचे आम आदमी पक्षाच्या सरकारशी संबंध आहेत. त्यामुळे संशयाची परिस्थिती निर्माण होते, यावर सखोल चर्चा झाली पाहिजे, असेही ते म्हणाले.