नवी दिल्ली : दक्षिण दिल्लीतील सत्यनिकेतन भागात मुलांचे वसतिगृह असलेली ५ मजली इमारत रविवारी दुपारी पत्त्यासारखी कोसळली. या भीषण दुर्घटनेत पाचजणांचा मृत्यू, तर १०जण गंभीर जखमी झाले. ढिगाऱ्याखाली अद्याप ३० हून अधिक विद्यार्थी अडकल्याची भीती व्यक्त होत असून, बचावकार्य वेगात सुरू आहे. दरम्यान, इमारतीचा मालक हरिराम याच्यासह आणखी काहीजणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नानकपुरा गुरुद्वाराजवळील ‘होस्टेल डेझ’ नावाची इमारत दुपारी दीड वाजता कोसळली. हा परिसर दिल्ली विद्यापीठाच्या साऊथ कॅम्पसनजीक असल्याने येथे विद्यार्थ्यांची गर्दी असते. दुर्घटनेच्या वेळी इमारतीच्या तळघरात बांधकामाचे काम सुरू होते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
युद्धपातळीवर बचावकार्य सुरू
घटनेची माहिती मिळताच अग्निशामक दलाच्या ८ गाड्या, एनडीआरएफ, डीडीएमए, दिल्ली पोलिस, कॅटस् ॲम्ब्युलन्स व नागरी संरक्षण दल घटनास्थळी दाखल झाले. ढिगाऱ्याखालून १० जणांना बाहेर काढून ‘एम्स’च्या ट्रॉमा सेंटरमध्ये दाखल करण्यात आले. त्यातील पाच जणांची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान, घटना घडली त्यावेळी इमारतीत किती विद्यार्थी होते, याचा अंदाज येत नसल्याने रात्री उशीरापर्यंत बचावकार्य सुरूच होते. रुग्णवाहिकांच्या मार्गात अडथळा येऊ नये म्हणून पोलिसांनी गर्दी पांगवून बंदोबस्त वाढवला आहे. खबरदारी म्हणून परिसरातील इतर इमारती रिकाम्या केल्या गेल्या. आपत्कालीन वाहनांना घटनास्थळी पोहोचण्यासाठी ग्रीन कॉरिडॉर तयार करतानाच गर्दी नियंत्रणासाठी शीघ्र कृती दलालाही पाचारण केले गेले.
दिल्लीचे नायब राज्यपाल तरणजित सिंह संधू, मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी घटनास्थळी पोहोचून बचावकार्याचा आढावा घेतला. तर गोवा दौर्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांच्याशी संवाद साधून घटनेची माहिती घेतली.
न्यायदंडाधिकारी करणार चौकशी
या घटनेची चौकशी जिल्हा न्यायदंडाधिकार्यांमार्फत करण्यात येणार असल्याची घोषणा दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केली. दुसरीकडे, प्रत्यक्षदर्शीने सांगितले की, ही इमारत जुनी होती व तळघरात काम सुरू होते. पावसामुळे तळघरात पाणी साचून इमारत कोसळल्याचा अंदाज आहे. या इमारतीत प्रत्येक मजल्यावरील एका खोलीत प्रत्येकी दोन विद्यार्थी राहात असल्याने सुमारे ४० विद्यार्थी तेथे असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
वर्षभरापूर्वी इमारत रिकामी
ही इमारत सुमारे वर्षभरापूर्वी रिकामी केली गेली होती. मात्र, दोन ते तीन महिन्यांपूर्वी येथे पुन्हा ‘पीजी’ सुरू झाली. इमारतीच्या तळघरातही काही काम सुरू होते. तेथे काम करणारे काही मजूर ढिगार्याखाली अडकल्याची शक्यता आहे. इमारतीच्या मालकासह इतरांवर साऊथ कॅम्पस पोलिस ठाण्यात कलम १०५, २९० व १२५ अ नुसार गुन्हा नोंद करण्यात आला असून, पोलिस दुर्घटनेची अधिक चौकशी करीत आहेत.