पुढारी ऑनलाईन डेस्क : सीबीआय अटक कारवाई विरोधातील मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची याचिका आज (दि.५)दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे.या प्रकरणी उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी केजरीवालांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
कथित मद्य धोरण प्रकरणीसीबीआयने केलेल्या अटकेला बेकायदेशीर असल्याचा दावा करणार्या आणि या प्रकरणी जामिनाची मागणी केजरीवालांनी आपल्या याचिकेतून केली होती. केजरीवाल यांच्या वकिलांनी या प्रकरणीच्या आदेशाबाबत स्पष्टता मागितली असता, न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांनी सांगितले की सोमवारी दुपारी 2:30 वाजता निकाल दिला जाईल, असे स्पष्ट केले हाेते.
दिल्लीतील कथित मद्य धोरण प्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना २६ जून रोजी सीबीआयने औपचारिकपणे अटक केली होती. केजरीवाल यांची न्यायालयात चौकशी करण्याची आणि त्यांच्या अटकेसाठी असलेली कागदपत्रे सादर करण्याची राऊस अव्हेन्यू न्यायालयाने सीबीआयला परवानगी दिल्यानंतर ही कारवाई करण्यात आली होती. केजरीवाल यांनी सीबीआयने केलेल्या अटक कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिले होते.
केजरीवाल यांच्या वतीने ज्येष्ठ वकील अभिषेक मनू सिंघवी यांनी युक्तीवाद केला. दरम्यान, 21 मार्च रोजी ईडीने अटक केलेल्या मुख्यमंत्र्यांना 20 जून रोजी ट्रायल कोर्टाने मनी लाँड्रिंग प्रकरणात जामीन मंजूर केला होता. तथापि, ट्रायल कोर्टाच्या आदेशाला उच्च न्यायालयाने स्थगिती दिली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात१२ जुलै रोजी अरविंद केजरीवाल यांना सर्वोच्च न्यायालयाने अंतरिम जामीन मंजूर केला होता. मात्र सीबीआय प्रकरणात त्यांचा जामीन अद्याप प्रलंबित असल्याने केजरीवाल न्यायालयीन कोठडीतच राहतील हे स्पष्ट झाले होते.