नवी दिल्ली, पुढारी वृत्तसेवा : दिल्लीत सलग पाचव्या दिवशी प्रदूषणाची पातळीची गंभीर श्रेणीत नोंद करण्यात आली. तसेच राजधानी दिल्ली आणि परिसरामध्ये सर्वत्र दाट धुके पसरल्याचे दिसले. केंद्रिय प्रदूषण नियंत्रण मंडळानुसार रविवारी (दि.१७) सकाळी ७ च्या सुमारास दिल्लीतील १४ ठिकाणी हवा गुणवत्ता निर्देशांक ४०० पेक्षा अधिक असल्याची नोंद झाली आहे. ४०० पेक्षा अधिकचा हवा गुणवत्ता निर्देशांक असणे म्हणजे गंभीर प्रदूषण श्रेणी होय.
दिल्लीतील आनंद विहारमध्ये ४५७, बवानामध्ये ४७१, मथुरा रोड परिसरात ४७१, द्वारका सेक्टर-८ येथे ४४५, आयटीओ येथे ४११, जहांगीरपुरी येथे ४६६, लोधी रोड परिसरात ३७४, आरके पुरम ४३४, वाझीपूर ४६१, अशा हवा गुणवत्ता निर्देशांकाची नोंद करण्यात आली. दिल्लीतील इंडिया गेट परिसर, अक्षरधाम मंदिर, हुमायु मकबरा, कुतुब मिनार, आयटीओ, सर्वोच्च न्यायालय यासारख्या ठिकाणांसह सर्वत्र दाट धुके पसरत आहे. यामुळे दूरचे दिसण्यास अडचण येत आहे. वाढत्या प्रदूषण पातळीमुळे नागरिकांना आरोग्याचा धोका निर्माण होत आहे.
दरम्यान, सरकारने प्रदूषणावर मात करण्यासाठी श्रेणी बद्ध उपाय योजनांचा तिसरा टप्पा दिल्लीत लागू केला आहे. सरकारी कार्यालयांच्या वेळांमध्ये बदल करण्यात आला आहे. तसेच पाचवीपर्यंतच्या शाळा ऑनलाईन पद्धतीने घेण्यात येत आहेत. तर उर्वरित वर्गातील विद्यार्थ्यांना मास्क परिधान करण्याची सक्ती करण्यात आली आहे. वाहनांमुळे होणारे प्रदूषण कमी करण्यासाठी सरकारने मेट्रोच्या 60 अतिरिक्त फेऱ्या सुरू केल्या असून नागरिकांना सार्वजनिक बस आणि मेट्रो आणि प्रवास करण्याचे आवाहन केले आहे.