Delhi Election | ‘शीशमहल’, ‘राजमहल’च्या पुढे झोपडीत राहणार्‍यांचे काय?  file photo
राष्ट्रीय

Delhi Election | ‘शीशमहल’, ‘राजमहल’च्या पुढे झोपडीत राहणार्‍यांचे काय?

दिल्ली विधानसभा निवडणूक रणधुमाळी; राजकीय वातावरण तापले

पुढारी वृत्तसेवा

प्रशांत वाघाये, नवी दिल्ली

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला सुरुवात झाली आहे. त्यामुळे वातावरणात प्रचंड गारठा असला तरी राजकीय वातावरण मात्र चांगलेच तापले आहे. यामध्ये आता दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान ‘शीशमहल’ म्हणून तर पंतप्रधान मोदींचे निवासस्थान ‘राजमहल’ म्हणून चर्चेत आहे. भाजपसह सर्व विरोधकांनी फार पूर्वीपासून दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानाला लक्ष्य केले. अलीकडे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी ‘मै अपने लिए भी शीशमहल बनवा सकता था’, असे म्हणत अप्रत्यक्षपणे केजरीवालांवर टीका केली. येत्या आठवड्यात सर्वपक्षीय बडे नेते जोरदार प्रचाराला सुरुवात करणार आहेत.

शिशमहल, राजमहल विषयात दोन पक्ष एकमेकांविरुद्ध रोजच भांडताना दिसत आहेत. यात तिसरा पक्ष असलेला काँग्रेस दोघांवरही टीका करत आहे. दरम्यान, भाजपने तर प्रचार सुरू होण्यापूर्वीच ‘शीशमहल’ मुद्दा बनवत रोज यानिमित्ताने वातावरण तापवले. अरविंद केजरीवाल मुख्यमंत्री असताना दिल्लीच्या मुख्यमंत्री निवासस्थानावर किती खर्च झाला, तो किती पटीने वाढवण्यात आला, त्याला कशा पद्धतीने सार्वजनिक बांधकाम विभागाने मान्यता दिली, या संदर्भातल्या एकेक गोष्टीचा पाढा रोज नवनव्या पद्धतीने भाजपद्वारे वाचला जात आहे. भाजपच्या याच गोष्टीला प्रत्युत्तर देण्यासाठी म्हणून पंतप्रधानांच्या निवासस्थानी किती खर्च झाला, कसा झाला, या गोष्टींचा ऊहापोह आम आदमी पक्षाच्या वतीने केला जात आहे. ज्या पद्धतीने भाजपने मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाला ‘शीशमहल’ संबोधले त्या पद्धतीने आम आदमी पक्ष किंवा अरविंद केजरीवाल पंतप्रधानांच्या निवासस्थानाला ‘राजमहल’ असे संबोधत आहेत. दोन दिवसांपूर्वी तर भाजपच्या कार्यकर्त्यांनी ‘शीशमहल’ सामान्य जनतेला बघण्यासाठी खुले करा, यासाठी आंदोलन केले. त्याला प्रत्युत्तर म्हणून पंतप्रधान निवासस्थान जनतेला बघण्यासाठी खुले करा, यासाठी आपच्या कार्यकर्त्यांनी आंदोलन केले. मात्र ‘शीशमहल’ विरुद्ध ‘राजमहल’ या लढाईमध्ये दिल्लीतला सर्वसामान्य झोपडीत राहणारा मतदार हा दुर्लक्षित आहे.

झोपडीत राहणार्‍या किंगमेकरला कोणी विचारणार का?

आतापर्यंत दिल्लीमध्ये जी सरकारे आली, त्या सरकारांना आणण्यात झोपडीमध्ये राहणार्‍या नागरिकांचा वाटा मोठा आहे. असे असूनही राजकीय पक्ष त्यांच्या गरजांची किंवा त्यांना हव्या असणार्‍या सोयी सुविधांची पूर्तता करतात का, हा मोठा प्रश्न आहे. दिल्लीत झोपडीत राहणारे लोक खर्‍या अर्थाने किंगमेकर आहेत. कारण त्यांनी ज्या बाजूला कौल दिला त्यांची सरकारे बनली आहेत. त्यामुळे संपूर्ण राजकीय गदारोळात शेवटच्या माणसाकडे लक्ष जाईल का, हा प्रश्न आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT