पुढारी ऑनलाईन डेस्क : Delhi building collapse | दिल्लीतील मुस्तफाबाद भागात आज पहाटे चार मजली इमारत कोसळली. यात ४ जणांचा मृत्यू झाला. सुमारे २६ हून अधिक लोक मलब्यात गाडले गेले आहेत. त्यातील १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढण्यात आले असून ८-१० लोक अजूनही अडकल्याची भीती व्यक्त केली जात आहे.
मुस्तफाबाद परिसरातील इमारत कोसळल्याची ही घटना कॅमेऱ्यात कैद झाली आहे. बचावकार्य सुरू असून आतापर्यंत १८ जणांना ढिगाऱ्यातून बाहेर काढले आहे. त्यातील १४ जणांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. एनडीआरएफ, दिल्ली पोलीस आणि अग्निशमन विभागाकडून बचाव कार्य सुरू आहे. स्थानिक नागरिकही बचाव कार्यात सहभागी झाले आहेत. अग्निशमन दलाच्या कर्मचाऱ्यांनी सांगितले की, त्यांना रात्री २:५० वाजता इमारत कोसळल्याची माहिती मिळाली. घटनास्थळी पोहोचल्यावर त्यांनी पाहिले की संपूर्ण इमारत ढासळली आहे आणि अनेक लोक मलब्यात अडकले आहेत. एनडीआरएफ आणि दिल्ली फायर सर्व्हिस लोकांना बचावण्यासाठी जोरदार प्रयत्न करत आहेत.
पोलिसांकडून इमारत कोसळण्यामागील कारणांचा शोध घेतला जात आहे. दिल्लीतील ईशान्य जिल्ह्याचे अतिरिक्त डीसीपी संदीप लांबा यांनी सांगितले की, "ही घटना पहाटे ३ वाजता घडली. १४ जणांना वाचवण्यात आले, परंतु त्यापैकी चार जणांचा मृत्यू झाला. बचावकार्य सुरू आहे. ८-१० लोक अजूनही अडकल्याची भीती आहे."