National Herald Case
नवी दिल्ली: दिल्लीतील राऊस अव्हेन्यू न्यायालयाने शुक्रवारी नॅशनल हेराल्ड प्रकरणात काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी आणि इतरांना सध्या नोटीस बजावण्यास नकार दिला. विशेष न्यायाधीश विशाल गोगणे यांनी या प्रकरणातील अंमलबजावणी संचालनालयाच्या (ईडी) याचिकेवर सुनावणी घेतली.
यावेळी न्यायाधीशांनी ईडीला या प्रकरणीचे आणखी कागदपत्रे सादर करण्यास, दोष दूर करण्यास सांगितले आणि नोटीस बजावण्यास नकार दिला. पुढील सुनावणी २ मे रोजी होणार आहे.
आरोपींची बाजू ऐकल्याशिवाय नोटीस बजावू शकत नाही, असे न्यायाधीश गोगणे म्हणाले. ईडीने काही गहाळ असलेली कागदपत्रे जमा करावी. त्यानंतर सोनिया गांधी, राहुल गांधी आणि इतरांना नोटीस बजावण्याचा निर्णय घेऊ, असे न्यायाधीशांनी म्हटले आहे.
दरम्यान, नॅशनल हेराल्ड वृत्तपत्र आणि असोसिएटेड जर्नल्स लिमिटेड (एजेएल) यांच्याशी संबंधित कथित आर्थिक गैरव्यवहार प्रकरणात ईडीने १५ एप्रिल रोजी पहिले आरोपपत्र दाखल केले आहे.
यामध्ये काँग्रेस संसदीय पक्षाच्या नेत्या सोनिया गांधी, लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी, सॅम पित्रोदा आणि सुमन दुबे यांची नावे आहेत. २०१२ मध्ये भाजप नेते सुब्रमण्यम स्वामी यांनी सोनिया गांधी, राहुल गांधी आणि त्यांच्या सहयोगी कंपन्यांशी संबंधित लोकांविरुद्ध या प्रकरणाची तक्रार केली होती. त्यानंतर ईडीने १३ जून २०२२ रोजी राहुल गांधींची चौकशी केली होती.