नवी दिल्ली : दिल्लीत सोमवारी घडवून?आणलेल्या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह एवढ्या वाईट अवस्थेत होते की, ते सहजासहजी ओळखणेही महाकठीण बनले होते. त्यातील 34 वर्षीय व्यापारी अमर कटारिया यांनी स्वतःच्या हातावर ‘मॉम माय फर्स्ट लव्ह’ आणि ‘डॅड माय स्ट्रेंथ’ असा टॅटू काढून घेतला होता. यामुळेच त्यांची ओळख पटल्याचे समोर आले आहे.
या स्फोटात मृत्युमुखी पडलेल्या आठजणांचे मृतदेह त्यांच्या कुटुंबीयांकडे ‘एलएनजेपी’ रुग्णालयात सोपविण्यात आले, तेव्हा उपस्थित असलेले सर्वजण गहिवरले. 34 वर्षीय व्यापारी अमर कटारिया सोमवारी संध्याकाळी मेट्रो पकडण्यासाठी निघाले होते. त्याचवेळी झालेल्या स्फोटात त्यांचा मृत्यू झाला. त्यांचे वडील जगदीश कटारिया यांनी सांगितले की, मला ‘एलएनजेपी’ रुग्णालयातून फोन आला होता. पलीकडून विचारणा झाली की, ‘मॉम माय फर्स्ट लव्ह’ असा टॅटू हातावर असलेल्या व्यक्तीबद्दल तुम्हाला माहिती आहे काय? मी तातडीने रुग्णालयात जाऊन पाहिले तेव्हा तो माझा मुलगा होता. मी तिथेच निःशब्द झालो.
22 वर्षीय नौमान अन्सारी हा उत्तर प्रदेशातील शामली येथून त्याच्या सौंदर्यप्रसाधनांच्या दुकानासाठी साहित्य खरेदी करण्यासाठी दिल्लीला आला होता. या स्फोटात त्याचाही मृत्यू झाला. त्याचा चुलत भाऊ अमनही जखमी झाला. नौमान हा कुटुंबातील एकमेव कमावता होता. उत्तर प्रदेशातील मेरठ येथील रहिवासी 35 वर्षीय मोहसीन, चांगल्या नोकरीच्या शोधात दिल्लीला आला होता. मात्र, नोकरी राहिली दूर, त्याची दिल्ली भेट अखेरची ठरली. या स्फोटात त्याचा मृत्यू झाला.
असाच एक?उमदा युवक पंकज याने बारावी पास झाल्यानंतर कॅब चालवायला सुरुवात केली होती. त्याचाही या स्फोटात मृत्यू झाला आहे. त्याचा मेहुणा निकेश कुमार याने स्फोटाची माहिती मिळताच पंकजचा शोध घेणे सुरू केले. अखेर, शवागारात भयानक अवस्थेत त्याला पंकजचा मृतदेह सापडला.
या स्फोटात मरण पावलेला 35 वर्षीय मोहम्मद जुनमान ई-रिक्षा चालवत असे. त्याचा फोन रात्रभर बंद असल्यामुळे कुटुंबाने त्याचा शोध घेतला. जुनमानचा निळा शर्ट आणि जॅकेट पाहून काका इद्रिस म्हणाले, हा माझा मोहम्मद आहे. जुनमानची पत्नी दिव्यांग आहे आणि त्याची तीन मुले आता अनाथ झाली आहेत.