दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच, 'जैश' चा हात 4 डॉक्टरांना अटक  
राष्ट्रीय

Delhi Red Fort Blast: दिल्ली स्फोट दहशतवादी हल्लाच, 'जैश' चा हात 4 डॉक्टरांना अटक

तपास ‘एनआयए’कडे; हल्ल्याची नवीन ‘मोडस ऑपरेंडी’ उघड

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली ः सोमवारी सायंकाळी लाल किल्ल्यासमोर हरियाणा पासिंगच्या आय-20 कारमध्ये झालेला तीव्र क्षमतेचा स्फोट हा दहशतवादी हल्लाच होता, यावर केंद्रीय तपास यंत्रणा आणि दिल्ली पोलिसांनी शिक्कामोर्तब केले आहे. रात्रभर केलेल्या कसून चौकशीनंतर फॉरेन्सिक सायन्स लॅबच्या अहवालाच्या आधारे दिल्ली पोलिसांनी मंगळवारी सकाळी अधिकृतपणे ही घटना दहशतवादी कारस्थान असल्याचे स्पष्ट केले. स्फोटके आणि ‌‘जैश‌’ मॉड्यूलशी संबंधित अटक केलेल्या चारही डॉक्टरांचा यामध्ये सहभाग असल्याचे उघड होत आहे.

केंद्रीय यंत्रणांच्या माहितीनुसार, गुजरात एटीएस, जम्मू-काश्मीर पोलिस, फरिदाबाद पोलिस आणि दिल्ली पोलिसांनी अटक केलेल्या पाकिस्तानी दहशतवादी संघटना ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’च्या दहशतवाद्यांच्या चौकशीतून हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. या दहशतवाद्यांचे मोबाईल कॉल डिटेल्स आणि सीसीटीव्ही फुटेजच्या तपासणीतून तपास यंत्रणा मोठ्या प्रमाणावर अंतिम निष्कर्षापर्यंत पोहोचल्या आहेत.दरम्यान, सोमवारी संध्याकाळी झालेल्या स्फोटाच्या घटनेचा तपास राष्ट्रीय तपास यंत्रणेकडे सोपविण्यात आला आहे. घटनेतील मृतांची संख्या 12 झाली आहे. प्रत्यक्षात ती जास्त असावी, असा संशय व्यक्त होत आहे.

‘जैश‌’ मॉड्यूलचा पर्दाफाश करताना आतापर्यंत पाच डॉक्टरांना अटक करण्यात आली आहे. सुरुवातीला जम्मूतून डॉ. आदिल राथेरला अटक करण्यात आली. त्याने दिलेल्या माहितीनुसार, डॉ. मुझम्मिल गनाई, डॉ. शाहीन सईद या दोघांसह आणखी काही साथीदारांना सोमवारीच अटक करण्यात आली. त्यांच्याकडून मोठ्या प्रमाणात स्फोटके आणि शस्त्रास्त्रे जप्त करण्यात आली. त्यापूर्वी डॉ. अहमद मोईद्दीन सय्यदला अटक करण्यात आली आहे, तर डॉ. उमर मोहम्मद हा स्फोटातील कार चालवत होता. हे सर्व ‌‘जैश‌’ मॉड्यूलशी संबंधित होते. दरम्यान, या स्फोटामुळे दहशतवाद्यांची नवीन ‌‘मोडस ऑपरेंडी‌’ समोर आली असून, अमोनियम नायट्रेट आणि इंधन तेलाच्या माध्यमातून स्फोट घडविण्याचा नवा प्रकार समोर आला आहे. अटकेतील डॉ. शाहीन सईदच्या नातेवाईकांकडे पोलिसांनी चौकशी केली. आणखी काहीजणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

मुझम्मिल हा मूळचा पुलवामातील कोईल येथील आहे, तर डॉ. शाहीन लखनौ येथील आहे. या दोघांना सोमवारीच जेरबंद केले आहे. दरम्यान, स्फोटातील कार चालवणाऱ्या डॉक्टर उमरच्या आईला स्फोटस्थळी सापडलेल्या शरीराच्या अवयवांशी ‌‘डीएनए‌’ नमुने जुळवण्यासाठी घेऊन गेलो आहोत, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.सोमवारी लाल किल्ला मेट्रो स्टेशनच्या पार्किंग क्षेत्राजवळ झालेल्या स्फोटात वापरलेली ह्युंदाई आय-20 कार डॉक्टर उमर नबी चालवत होता, असे स्पष्ट झाले आहे.

‌‘ते‌’ पाच डॉक्टर कोण?

नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीर, हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्ये सुरू असलेल्या दहशतवादविरोधी मोहिमेत एका राज्याबाहेरील दहशतवादी मॉड्यूलचा पर्दाफाश करण्यात आला. त्यात चार डॉक्टर आणि एका मृत सदस्यासह अनेक संशयितांना अटक करण्यात आली आहे. जम्मू आणि काश्मीर पोलिस, हरियाणा पोलिस, उत्तर प्रदेश पोलिस आणि केंद्रीय एजन्सींच्या संयुक्त पथकांनी श्रीनगर, फरिदाबाद, सहारनपूर आणि इतर ठिकाणी संयुक्त छापे टाकून स्फोटके, बंदुका आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य मोठ्या प्रमाणात जप्त केले आहे. या सर्वांचा ‌‘जैश-ए-मोहम्मद‌’शी संबंध असल्याचे स्पष्ट झाले आहे.

पोलिसांनी ही ‌‘व्हाईट कोट टेरर इको-सिस्टीम‌’ शोधून काढली. यातील सर्वजण शैक्षणिक आणि व्यावसायिक नेटवर्कच्या नावाखाली काम करणारे कट्टरपंथी व्यावसायिक आहेत. 19 ऑक्टोबर रोजी श्रीनगरच्या बनपोरा नौगाम भागात‌ ‘जैश-ए-मोहम्मद‌’ (जेईएम) चे पोस्टर्स दिसल्यानंतर तपास सुरू झाला, ज्यामध्ये सुरक्षा दलांना धमकी देण्यात आली होती. पोलिसांनी एक ‌‘व्हाईट कोट टेरर इको-सिस्टीम‌’ शोधून काढली, ज्यामध्ये शैक्षणिक आणि व्यावसायिक नेटवर्कच्या नावाखाली काम करणारे कट्टरपंथी व्यावसायिक आणि विद्यार्थी यांचा समावेश होता, जो निधी, शस्त्रे आणि स्फोटके हलविण्यासाठी एन्क्रिप्टेड चॅनल आणि धर्मादाय आघाड्यांद्वारे समन्वय साधत होता.

'हे' आहेत ते पाच डॉक्टर


1) डॉ. मुझम्मिल गनाई

काश्मीरमधील पुलवामा येथील कोईल येथील 35 वर्षीय डॉ. मुझम्मिल गनाई हा फरिदाबादमधील अल फलाह विद्यापीठाच्या रुग्णालयात डॉक्टर म्हणून काम करत होता. तो एमबीबीएस विद्यार्थ्यांसाठी अध्यापन करत होता. त्याच्या अटकेनंतर, पोलिसांनी फरिदाबादमधील धौज येथील त्याच्या भाड्याच्या घरातून 358 किलो अमोनियम नायट्रेट, तीन मॅगझिनसह एक क्रिन्कोव्ह असॉल्ट रायफल, 91 जिवंत काडतुसे, काडतुसासह एक पिस्तूल, टायमर, बॅटरी, रिमोट कंट्रोल, वायर, धातूचे पत्रे आणि इतर बॉम्ब बनवण्याचे साहित्य जप्त केले. विद्यापीठाच्या प्रयोगशाळेचा आणि संबंधित सुविधांचा वापर स्फोटके साठवण्यासाठी केला जात असावा, असे प्राथमिक तपासात असे दिसून आले आहे.

2) डॉ. आदिल राथेर

काश्मीरमधील डॉ. आदिल राथेरला उत्तर प्रदेशातील सहारनपूर येथून अटक करण्यात आली. डॉ. आदिल हा डॉ. मुझम्मिल आणि डॉ. उमर यांच्यासोबत अल फलाह विद्यापीठातही काम करत होता. तपासकर्त्यांना जीएमसी श्रीनगर येथील त्याच्या लॉकरमधून एके-47 रायफल जप्त करण्यात आली आणि तो स्फोटके, शस्त्रे आणि बॉम्ब बनवण्याचे साहित्य जमा करण्यात गुंतलेल्या फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलचा भाग होता.

3) डॉ. शाहीन सईद

लखनौ येथील एक डॉक्टर आणि डॉ. मुझम्मिलची कथित प्रेयसी आहे. तिला चौकशीसाठी विमानाने श्रीनगरला आणण्यात आले. डॉ. मुझम्मिलच्या अटकेनंतर घाबरलेल्या शाहीन सईदने रायफल कचऱ्याच्या डब्यात टाकून दिली होती. पोलिसांनी फरिदाबादमध्ये तिच्या कारमधून एक असॉल्ट रायफल जप्त केली. डॉ. शाहीनने फरिदाबादमध्ये डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल यांच्यासोबत काम केले होते, काश्मीरमधील नेटवर्कशीही संबंध ठेवला होता. तसेच, मसूद अझहरच्या बहिणीशी संबंध वाढवून भारतात महिला दहशतवाद्यांचे नेटवर्क उभारण्यात ती गुंतल्याचा संशय आहे.

4) डॉ. उमर मोहम्मद

हा काश्मीरमधील पुलवामा येथील आहे. डॉ. मुझम्मिल आणि डॉ. आदिल यांच्यासोबत अल फलाह विद्यापीठाच्या टीममध्ये त्याचा भाग होता. डॉ. उमर फरार होता आणि पोलिस त्याच्या अटकेचा सक्रियपणे शोध घेत होते.

सूत्रांनी सांगितले की, त्याचे फरिदाबाद दहशतवादी मॉड्यूलशी थेट संबंध होते आणि अधिकारी स्फोटके आणि शस्त्रास्त्रांच्या साठवण आणि वितरणात त्याच्या भूमिकेची चौकशी करत आहेत. तो दिल्ली स्फोटात ज्या कारमध्ये स्फोट झाला ती चालवत होता.

5) डॉ. अहमद मोईद्दीन सय्यद

चीनमधून एमबीबीएस पदवी घेतलेल्या हैदराबाद येथील डॉ. अहमद मोईद्दीन सय्यदला गुजरात एटीएसने 8 नोव्हेंबर रोजी अटक केली. डॉ. सय्यद राजेंद्रनगरमध्ये शोरमा व्यवसाय चालवत होता. परंतु, सोशल मीडिया आणि टेलिग्रामद्वारे तो कट्टरपंथी आणि चिथावणी देणाऱ्या पोस्ट करत होता आणि इतरांना कट्टरपंथी बनवत होता. तो इस्लामिक स्टेट-खोरासन प्रांतशी संबंधित अबू खादीजा नावाच्या हँडलरच्या संपर्कात होता.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT