नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीची घोषणा काही दिवसांमध्ये होण्याची शक्यता आहे; तर पुढील महिन्यात मतदान होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शुक्रवारी, दिल्लीत विविध विकासकामांचे उद्घाटन आणि पायाभरणी करून निवडणुकीच्या प्रचाराला जोरदार सुरुवात केली आहे. दुसरीकडे, आम आदमी पक्षाने माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या नेतृत्वात निवडणूक प्रचाराला सुरुवात केली आहे; तर काँग्रेस पक्ष राजधानीत म्हणावा तेवढा मजबूत नाही. त्याबरोबरच काँग्रेसकडे दिल्लीतील स्थानिक प्रभावी चेहरा नाही. त्यामुळे दिल्लीतील रणधुमाळीत पंतप्रधान नरेंद्र मोदी विरुद्ध अरविंद केजरीवाल आमने-सामने येण्याची शक्यता आहे.
दिल्ली विधानसभा निवडणूक अगदी तोंडावर आली आहे. दरम्यान, शुक्रवारी दिल्ली भाजपने ‘एक्स’वर पोस्ट केली आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, ‘दिल्ली चली मोदी के साथ.’ तसेच याअगोदरही पक्षाने ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्यावर लढण्याचे संकेत दिले होते. आता हे संकेत खरे ठरत असून, भाजप ही निवडणूक पंतप्रधान मोदी यांच्या चेहर्यावर लढणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. आतिशी यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतल्यावर सांगितले होते की, पुन्हा केजरीवाल यांना मुख्यमंत्री करायचे आहे. त्यामुळे ‘आप’ माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या चेहर्यावर निवडणूक लढवणार, हे तेव्हाच स्पष्ट झाले होते. त्यावर केजरीवाल यांनी योजनांच्या घोषणा करून शिक्कामोर्तब केले.
देशभरात काँग्रेस विरुद्ध भाजप अशी लढाई आहे. मात्र, दिल्लीत भाजपचा प्रमुख विरोधी पक्ष काँग्रेस नसून, आम आदमी पक्ष आहे; तर काँग्रेस पक्ष म्हणावा तेवढा मजबूत नाही. काँग्रेसच्या शीला दीक्षित मुख्यमंत्री होत्या तेव्हा पक्षाला राजधानीत चांगले दिवस होते. मात्र, अलीकडच्या दशकात काँग्रेसची राजधानीतील अवस्था बिकट झाली आहे. सध्याच्या विधानसभेत काँग्रेसचा एकही आमदार नाही. काँग्रेसची मतपेटी आम आदमी पक्षाकडे गेली आहे. ‘आप’ आणि काँग्रेसमधील मत विभाजनाचा भाजपला लाभ होण्याची शक्यता आहे.