पुढारी ऑनलाईन डेस्क : दिल्ली विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर झाला. दुपारी २ पर्यंतच्या आकडेवारीनुसार भाजपला बहुमत मिळाले आहे. आपचे संयोजक अरविंद केजरीवाल नवी दिल्ली मतदारसंघातून निवडणूक हरले आहेत. मनीष सिसोदिया यांनीही जंगपुरा येथून पराभव स्वीकारला आहे. भाजप ४८ तर आम आदमी पक्ष २३ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस सलग तिसऱ्यांदा 'शून्य' वर आल्याचे दिसते. १९९३ मध्ये भाजपने पहिल्यांदा दिल्ली निवडणूक जिंकली होती. २७ वर्षानंतर भाजपला दिल्लीचे तख्त पालटण्यात यश आले.
नवी दिल्लीतून निवडणूक जिंकलेले भाजप नेते प्रवेश वर्मा यांनी एक्सवर पोस्ट केली आहे. त्यांनी लिहिले की, अंधार दूर झाला आहे, सूर्य उगवला आहे, कमळ फुलले आहे. दिल्लीने विकास निवडला आहे. हा विजय दिल्लीच्या विश्वासाचा आहे, हा विजय दिल्लीच्या भविष्याचा आहे. भारतीय जनता पक्षाच्या प्रत्येक कार्यकर्त्याच्या कठोर परिश्रमाबद्दल आणि दिल्लीतील जनतेच्या विश्वासाबद्दल आभारी आहे. दिल्लीच्या या नवीन पहाट साठी सर्व दिल्लीवासीयांचे अभिनंदन.
स्पष्ट बहुमतासह मोठ्या विजयाकडे दिल्लीत भाजपची घोडदौड सुरू आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी भाजप मुख्यालयात संध्याकाळी ७.३० वा कार्यकर्त्यांना संबोधित करणार आहेत.
मालवीय नगर मतदारसंघातील आपचे उमेदवार सोमनाथ भारती यांचाही पराभव झाला आहे.
आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल यांचा नवी दिल्ली मतदारसंघातून पराभव झाला आहे. भाजपचे प्रवेश वर्मा येथे विजयी झाले आहेत. केजरीवाल यांची ही चौथी निवडणूक होती आणि ते पहिल्यांदाच निवडणूक हरले आहेत.
दिल्ली विधानसभा निवडणुकीत आपला मोठा धक्का बसला आहे. पक्षाचे सर्वेसर्वा आणि दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांचा पराभव झाला आहे.
ट्रेंडनंतर आता निकाल येऊ लागले आहेत. कोंडली मतदारसंघातून आपचे कुलदीप कुमार विजयी झाले आहेत. त्याचवेळी, नवी दिल्ली मतदारसंघात केजरीवाल १८०० मतांनी मागे आहेत. भाजपचे प्रवेश वर्मा यांनी मोठी आघाडी घेतली आहे.
आप नेते मनीष सिसोदिया यांनी जंगपुरा मतदारसंघातून पराभव स्वीकारला आहे. ते म्हणाले, जंगपुराने प्रेम, आपुलकी आणि समानता दिली. त्यांचा सुमारे ६०० मतांनी पराभव झाला.
आपसाठी अस्तित्वाची लढाई तर भाजपची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीचे निकाल स्पष्ट होत आहेत. येथे आपला मोठा हादरा बसला असून तब्बल २७ वर्षांनंतर भाजपने विधानसभेवर सत्ता स्थापन करण्याकडे वाटचाल सुरु केली आहे.निर्णायक बहुमताकडे पक्षाने वाटचाल सुरु ठेवल्याने दिल्लीतील भाजप कार्यकर्त्यांनी पक्षाच्या कार्यालयाबाहेर विजयोत्सवाला प्रारंभ झाला आहे.
दिल्ली निवडणुकीचा पहिला निकाल आला आहे. कस्तुरबा नगर मतदारसंघातून भाजपचे नीरज बसोया विजयी झाले आहेत. भाजप आतापर्यंत ४६ जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्ष २४ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्ली निवडणूक निकालात आतापर्यंतच्या आकडेवारीनुसार आम आदमी पक्ष पिछाडिवर आहे. आपच्या खराब कामगिरीबद्दल ज्येष्ठ समाजसेवक अण्णा हजारे म्हणाले की, मी नेहमीच असे म्हटले आहे की उमेदवाराचे वर्तन, त्याचे विचार शुद्ध असले पाहिजेत. जीवनावर कोणताही डाग नसावा. चांगले गुण मतदारांचा विश्वास वाढवतात. मी केजरीवाल यांना हे सर्व सांगितले होते. पण त्यांनी त्याकडे लक्ष दिले नाही. त्यांनी दारूवर लक्ष केंद्रित केले, असे अण्णा हजारे म्हणाले.
पंतप्रधान मोदी संध्याकाळी ७ वाजता भाजप कार्यालयाला भेट देणार आहेत. पक्षाच्या कार्यकर्त्यांना आणि नेत्यांना संबोधित करणार आहेत.
नवी दिल्ली मतदारसंघातून अरविंद केजरीवाल विरूद्ध प्रवेश वर्मा यांच्यात काट्याची टक्कर
सध्या प्रवेश वर्मा २२५ मतांनी आघाडीवर आहेत.
कालकाजी मतदारसंघातून मुख्यमंत्री आतिशी पिछाडीवर, माजी खासदार रमेश बिधुडी यांची आघाडी
जंगपुरा मतदारसंघातून मनिष सिसोदिया आघाडीवर, सिसोदिया (आप), तरविंदर सिंह मारवाह (भाजप), आणि फरहान सूरी (कॉंग्रेस) यांच्यात लढत
दिल्ली निवडणुकीच्या निकालांवर काँग्रेस खासदार प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली आहे. प्रियांका म्हणाल्या, मला माहित नाही. मी अजून (निवडणूक ट्रेंड) तपासलेले नाही. कालकाजी येथील काँग्रेस उमेदवार अलका लांबा म्हणाल्या की, ज्यांनी दिल्लीचे नुकसान केले आहे त्यांना आम्ही नुकसान पोहोचवत आहोत. मी एक तासानंतर मतमोजणी केंद्रावर परत येईन.
जंगपुरा विधानसभा मतदारसंघात आपचे आमदार मनीष सिसोदिया भाजपचे तरविंदर सिंग मारवाह यांच्याविरुद्ध आघाडीवर आहेत.
भाजप आणि आपमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू आहे. आतापर्यंत भाजप ३९ जागांवर आघाडीवर आहे. तर आप देखील ३० जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
नजफगडमधून भाजप ४३८३ मतांनी पुढे आहे. मटियाला मतदारसंघातून भाजप २८६२ मतांनी पुढे आहे. उत्तम नगरमधून भाजप २२२३ मतांनी पुढे आहे. द्वारका मतदारसंघातून भाजप १२५७ मतांनी पुढे आहे. बिजवासन आणि पालम मतदारसंघातही भाजप आघाडीवर आहे. पटेल नगरमध्ये भाजपचे राजकुमार आनंद आघाडीवर आहेत. ओखला मतदारसंघातून भाजप सतत पुढे आहे. पहिल्या फेरीची मतमोजणी पूर्ण झाली आहे.
अरविंद केजरीवाल यांनी नवी दिल्ली मतदारसंघाच्या निवडणूक रिंगणात आघाडी घेतली आहे. २५४ मतांनी त्यांनी आघाडी घेतली आहे. आतापर्यंत भाजप ४६ जागांवर आणि आप २३ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्ली निवडणुकीचे ट्रेंड येऊ लागले आहेत. भाजपला मोठी आघाडी मिळत असल्याचे दिसून येत आहे. यावर नॅशनल कॉन्फरन्सचे नेते आणि जम्मू-काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी प्रतिक्रिया दिली आहे. उमर यांनी एक्स वर एक व्हिडिओ पोस्ट केला आणि कॅप्शनमध्ये लिहिले, "आपसात अधिक लढा."
निवडणूक आयोगाने आकडेवारी जाहीर केली आहे. यामध्ये भाजपला बहुमत मिळाले आहे. भाजप ३६ जागांवर आघाडीवर आहे. आम आदमी पक्ष १६ जागांवर आघाडीवर आहे.
दिल्ली निवडणुकीत ईव्हीएमची मतमोजणी सुरू झाली आहे. सुरुवातीच्या ट्रेंडमध्ये, केजरीवाल यांचा झाडू सतत मागे पडत आहे. तर भाजपचे कमळ निर्णायक आघाडी मिळवत आहे. केजरीवाल १५०० मतांनी मागे आहेत. भाजप सध्या ४३ जागांवर आघाडीवर आहे. 'आप'ने २६ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे. करावल नगरमधून भाजपचे कपिल मिश्रा आघाडीवर असल्याचे दिसून येत आहे. काँग्रेसचे देवेंद्र यादव बादली येथून आघाडीवर आहेत.
सध्याच्या ट्रेंडनुसार, दिल्लीतील सत्ता बदलत असल्याचे दिसून येत आहे. भाजपने बहुमताचा आकडा ओलांडला आहे. भाजपने ४२ जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्षाने २६ जागांवर आघाडी घेतली आहे. काँग्रेस एका जागेने पुढे आहे.
केजरीवाल, आतिशी आणि सिसोदिया हे सर्वजण पोस्टल मतपत्रिकांच्या मोजणीत मागे पडले आहेत. भाजपने आतापर्यंत १४ जागांवर आघाडी घेतली आहे. आम आदमी पक्ष ९ जागांवर आघाडीवर आहे. काँग्रेस एका जागेवर आघाडीवर आहे.
पोस्टल मतपत्रिकांची प्रथम मोजणी केली जात आहे. त्यानंतर ईव्हीएम उघडले जातील आणि मतमोजणी सुरू होईल.
दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या ७० मतदारसंघांसाठी मतमोजणी सुरू झाली आहे.
सर्वांच्या नजरा देशाची राजधानी दिल्लीवर खिळल्या आहेत, आज दिल्लीमध्ये कोणाची सत्ता येणार याचे चित्र स्पष्ट होणार आहे. सकाळी ८ वाजता मतमोजणी सुरू झाली आहे.