राष्ट्रीय

दिल्ली विमानतळावर लोखंडी छत कोसळून 1 ठार, 6 जखमी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीतील इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या टर्मिनल- 1 वरील लोखंडी छताचा भाग कोसळून झालेल्या अपघातात एकाचा मृत्यू झाला तर सहाजण जखमी झाले. दिल्लीत मुसळधार पाऊस सुरू असताना शुक्रवारी पहाटेच्या सुमारास हा अपघात घडला. त्यामध्ये अनेक गाड्यांचीही नासधूस झाली. या अपघातानंतर केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री राम मोहन नायडू आणि राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.

अपघातानंतर जखमींना तातडीने रुग्णालयात हलवून टर्मिनल 1 वरील सर्व विमानांचे उड्डाण दुपारी दोनपर्यंत रद्द करण्यात आले. चेक इन काऊंटरही काही काळ बंद होते. अपघातानंतर बचावकार्य सुरू असून आपण जातीने त्यावर लक्ष ठेवून असल्याचे केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री नायडू यांनी एक्सवर केलेल्या पोस्टमध्ये म्हटले आहे.

दुर्घटनेत मृत्यू झालेल्या व्यक्तीच्या नातेवाईकांना 20 लाख रुपये आणि जखमींना 3 लाख रुपये मदत दिली जाणार असल्याची माहिती केंद्रीय नागरी उड्डाण राज्यमंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली. या घटनेची उच्चस्तरीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. टर्मिनल एकवरील उड्डाण रद्द झालेल्या प्रवाशांना तिकिटाचे पैसे परत देण्याचे आणि प्रवाशांना पर्यायी उड्डाणे उपलब्ध करून देण्याच्या सूचना देण्यात आल्याची माहिती मोहोळ यांनी दिली.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT