राष्ट्रीय

Delhi Airport Fire Accident : दिल्ली विमानतळावर मोठी दुर्घटना टळली: स्विस एअरच्या विमानाला टेक-ऑफ दरम्यान आग, ६ प्रवासी जखमी

पुढारी वृत्तसेवा

नवी दिल्ली : दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावर शनिवारी रात्री एक मोठा अनर्थ टळला. स्विस एअरच्या ज्युरीचला जाणाऱ्या विमानाने उड्डाण घेण्यापूर्वीच त्याच्या इंजिनला भीषण आग लागली. वैमानिकाने प्रसंगावधान राखत उड्डाण रद्द केल्याने विमानातील २३२ प्रवाशांचे प्राण वाचले आहेत. मात्र, आपत्कालीन परिस्थितीत विमानातून बाहेर पडताना झालेल्या धावपळीत सहा प्रवासी जखमी झाले आहेत.

नेमकी घटना काय?

मिळालेल्या माहितीनुसार, स्विस एअरचे 'एलएक्स १४७' (LX147) हे विमान दिल्लीहून ज्युरीचसाठी उड्डाण भरण्याच्या तयारीत होते. विमान रनवेवर धावत असतानाच अचानक इंजिन क्रमांक-१ मध्ये तांत्रिक बिघाड झाला आणि त्याने पेट घेतला. इंजिनमधून आगीच्या ज्वाळा बाहेर येत असल्याचे लक्षात येताच वैमानिकाने तत्काळ 'टेक-ऑफ' थांबवण्याचा निर्णय घेतला आणि विमान रनवेवरच सुरक्षितरीत्या रोखले.

या घटनेमुळे विमानतळ परिसरात एकच खळबळ उडाली आणि तातडीने आणीबाणी (इमर्जन्सी) घोषित करण्यात आली. अग्निशमन दलाच्या गाड्यांनी घटनास्थळी धाव घेत परिस्थितीवर नियंत्रण मिळवले.

प्रवाशांची धावपळ आणि दुखापत

विमानाच्या इंजिनला आग लागल्याचे समजताच प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आणि गोंधळ उडाला. प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढण्यासाठी विमानाच्या 'इमर्जन्सी स्लाईड्स'चा (आपत्कालीन घसरगुंडी) वापर करण्यात आला. या प्रक्रियेदरम्यान झालेल्या धावपळीत आणि घसरगुंडीवरून खाली उतरताना सहा प्रवाशांना दुखापत झाली. जखमी प्रवाशांना तात्काळ उपचारासाठी मेदांता रुग्णालयात दाखल करण्यात आले असून, त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

विमानतळ प्रशासनाची कार्यवाही

या अपघातानंतर सुरक्षेच्या कारणास्तव दिल्ली विमानतळावरील धावपट्टी क्रमांक-२८ काही काळासाठी वाहतुकीसाठी बंद करण्यात आली होती. एअरलाईन प्रशासनाने विमानातील सर्व प्रवाशांच्या निवासासाठी हॉटेलची व्यवस्था केली असून, त्यांच्यासाठी पर्यायी विमानाचे नियोजन केले जात आहे. परिस्थिती हाताळण्यासाठी विमानतळावरील 'क्राइसिस मॅनेजमेंट सेंटर' आणि बचाव पथक सक्रिय झाले आहे.

दिल्ली विमानतळावर तांत्रिक बिघाड किंवा विमानांच्या टक्करीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने प्रवाशांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. या घटनेच्या सखोल चौकशीचे आदेश देण्यात आले असून तांत्रिक बिघाडाचे नेमके कारण शोधले जात आहे.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT