दिल्लीतील हवा प्रदूषणाबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी पंतप्रधानांना पत्र लिहिले आहे. ANI X Account
राष्ट्रीय

दिल्लीत हवा प्रदूषण; कृत्रिम पावसाची गरज, पर्यावरण मंत्र्यांचे PM मोदींना पत्र

Delhi Weather | विषम - सम बाबतही चर्चा सुरू

अविनाश सुतार

पुढारी ऑनलाईन डेस्क : राजधानी दिल्लीतील हवा प्रदूषणाची पातळी धोक्याच्या पातळीवर पोहोचली आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी दिल्ली सरकारने पाऊले उचलण्यास सुरूवात केली आहे. प्रदूषण दूर करण्यासाठी कृत्रिम पावसाची गरज आहे. तसेच विषम - सम बाबतही चर्चा सुरू आहे. केंद्र सरकारने प्रदूषणाबाबत लवकरच बैठक घ्यावी. याबाबत दिल्लीचे पर्यावरण मंत्री गोपाल राय यांनी मंगळवारी (दि.१९) केंद्र सरकारला पत्र लिहले आहे. पत्राद्वारे राष्ट्रीय राजधानीतील वाढत्या वायू प्रदूषणाच्या पातळीचा सामना करण्यासाठी राष्ट्रीय राजधानीत कृत्रिम पाऊस पाडण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्तक्षेपाची मागणी त्यांनी केली आहे.

गोपाल राय म्हणाले की, यासंदर्भात केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांना पत्र पाठवले आहे. दिल्ली सरकार आणि आयआयटी कानपूर यांच्यासह सर्व संबंधित केंद्रीय संस्थांनी प्रदूषण कमी करण्यासाठी कृती आराखडा बनवावा. वाऱ्याचा वेग कमी होऊन थंडी वाढल्याने धुक्याची चादर तयार होते, तेव्हा त्याला तोडण्यासाठी कृत्रिम पाऊस पाडावा.

दिल्ली सरकारने संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांना ग्रुप 4 च्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना दिल्या आहेत. वाढत्या प्रदूषणाची समस्या लक्षात घेऊन GREP च्या चौथ्या टप्प्यातील निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. सर्व संबंधित विभागांची बैठक घेऊन त्यांना आवश्यक ती सर्व पावले उचलण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत, असेही त्यांनी सांगितले.

गट 4 च्या निर्बंधांची काटेकोरपणे अंमलबजावणी करण्याच्या सूचना

प्रदूषणाच्या गंभीर परिस्थितीमुळे वृद्धांना खूप त्रास होत आहे. शाळा बंद ठेवाव्या लागतात.उत्तर भारतात, AQI बहादुरगडमध्ये 477, भिवानीमध्ये 468, चुरूमध्ये 472, गुरुग्राममध्ये 448, धरू हेरामध्ये 410 वर पोहोचला आहे. संपूर्ण उत्तर भारतात बदलत्या हवामानामुळे प्रदूषणाचा परिणाम घातक ठरत आहे. संपूर्ण उत्तर भारत गंभीर प्रदूषणाच्या विळख्यात आहे. लोकांना श्वास घेण्यास त्रास होत आहे. केंद्रीय पर्यावरण मंत्र्यांनी पुढाकार घेऊन सर्वांना सोबत घेऊन काम करण्याची ही वेळ आहे, असे रॉय म्हणाले.

मोठ्या ट्रकसह बीएस-4 डिझेल वाहनांच्या प्रवेशावर बंदी

राय म्हणाले की, दिल्लीत ग्रेप-4 लागू करण्यात आला आहे. या अंतर्गत दिल्लीत मोठे ट्रक आणि बीएस-4 डिझेल वाहनांच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. त्याचबरोबर सर्व प्रकारच्या बांधकाम आणि पाडकामावर पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. केवळ सीएनजी, इलेक्ट्रिक, बीएस-6 डिझेल आणि अत्यावश्यक वस्तू आणि सेवा पुरवणाऱ्या व्यावसायिक वाहनांना सूट दिली आहे. 10 वी आणि 12 वीचे वर्ग वगळता सर्व शाळा बंद करण्यात आल्या आहेत. मास्क देण्याच्या सूचना दिल्या आहेत. प्रदूषणाशी संबंधित रुग्णांवर उपचार करण्यासाठी आरोग्य विभागाला विशेष टास्क फोर्स तयार करण्याचे आदेश दिले आहेत.

....तर केंद्रीय मंत्र्यांनी राजीनामा द्यावा

पत्रकार परिषदेदरम्यान राय यांनी केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांच्यावरही टीका केली. ते म्हणाले की, “माझ्या ऑगस्ट, सप्टेंबर, ऑक्टोबर आणि आज चार पत्रे पाठवूनही त्यांनी कृत्रिम पावसावर एकही बैठक बोलावली नाही”. "पंतप्रधान मोदींनी त्यांच्या पर्यावरण मंत्र्यांना कृत्रिम पावसाबाबत बैठक बोलावायला सांगावी. कृत्रिम पावसासाठी एकतर तोडगा काढावा किंवा मोकळा मार्ग काढावा. जर केंद्र सरकार कारवाई करू शकत नसेल तर त्यांच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यावा," असे ते म्हणाले.

लोकल ते ग्लोबल बातम्यांसाठी डाऊनलोड करा दैनिक पुढारीचे Android आणि iOS मोबाईल App.

'Pudhari' is excited to announce the relaunch of its Android and iOS apps. Stay updated with the latest news at your fingertips.

Android and iOS Download now and stay updated, anytime, anywhere.

SCROLL FOR NEXT