नवी दिल्ली: दिल्लीतील विधानसभा निवडणुकीपूर्वी आम आदमी पक्षाच्या सरकारने वृद्धांसाठी पेन्शन योजना पुन्हा सुरू करण्याची घोषणा केली. या योजनेत ८० हजार नवीन वृद्धांचा समावेश करण्यात आला आहे.
यापूर्वी साडेचार लाख लोकांना या योजनेचा लाभ मिळत होता. आता पाच लाखांहून अधिक वृद्ध या योजनेच्या कक्षेत येणार आहेत, असे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सांगितले. योजनेसाठी संकेतस्थळ सुरु केल्यानंतर पहिल्या २४ तासांत १० हजारहून अधिक लोकांनी नोंदणी केली असल्याचे त्यांनी सांगितले.
अरविंद केजरीवाल म्हणाले की, देशातील ज्येष्ठांना सर्वाधिक पेन्शन दिल्लीत दिली जात आहे. दुहेरी इंजिन सरकार असलेल्या इतर राज्यांमध्ये पेन्शन खूप कमी आहे. मध्य प्रदेश, महाराष्ट्रात दरमहा ५०० ते ६०० रुपये दरमहा मिळतात. २०१५ मध्ये आमचे सरकार आले तेव्हा आम्ही दिल्लीत पेन्शन दुप्पट केली. पूर्वीची सरकारे ६० ते ६९ वयोगटातील वृद्धांना दरमहा १ हजार रुपये देत असत. आम्ही ते २ हजार रुपये केले. ७० वर्षांवरील ज्येष्ठ नागरिकांचा भत्ता दीड हजार रुपयांवरून अडीच हजार रुपये प्रति महिना करण्यात आला. मी त्यांच्या आशीर्वादाने तुरुंगातून बाहेर आलो. त्यांचे आभार मानण्यासाठी ही योजना आहे, असे त्यांनी सांगितले.