पुढारी ऑनलाईन डेस्क : Dehradun Student Accident | उत्तराखंडची राजधानी डेहराडून येथे सोमवारी रात्री झालेल्या भीषण अपघातात सहा विद्यार्थ्यांचा मृत्यू झाला. या अपघातात गंभीर जखमी झालेल्या एका विद्यार्थ्याची रुग्णालयात मृत्यूशी झुंज सुरू आहे. दरम्यान, अपघातापूर्वीचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये सर्व ७ विद्यार्थी एका खोलीत पार्टी करताना दिसत आहेत. पार्टी केल्यानंतर सर्वजण कारमधून लाँग ड्राईव्हला निघाले होते, मात्र कारचा वेग जास्त असल्याने चालकाचे नियंत्रण सुटून कार ट्रकला धडकली. (Dehradun Accident)
डेहराडूनमधील ओएनजीसी चौकात सोमवारी रात्री दीडच्या सुमारास एका ट्रकला धडकल्याने इनोव्हा कारचा चक्काचूर झाला. कारमध्ये प्रवास करणाऱ्या सहा विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. यामध्ये तीन मुली आणि तीन मुले होती. तर, सिद्धेश अग्रवाल (वय २५) याला शहरातील सिनर्जी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. या अपघाताचे दृश्य अंगावर काटा आणणसारखं होतं. कारमध्ये मृतदेह छिन्नविछिन्न अवस्थेत पडलेले होते. सीटवर रक्त दिसत होते. त्याचवेळी विद्यार्थ्यांच्या शरीराचे तुकडे रस्त्यावर विखुरले होते. (Dehradun Accident)
अपघातापूर्वी या विद्यार्थ्यांच्या पार्टीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. पोलिसांना अपघातातील जखमी विद्यार्थी सिद्धेश अग्रवालच्या मोबाईल फोनवरून हा व्हिडिओ मिळाला आहे. ज्यामध्ये सर्वजण एका खोलीत पार्टी करताना दिसत आहेत. काही सेकंदांचा हा व्हिडिओ सध्या व्हायरल होत आहे. दरम्यान, सिद्धेश बरा झाल्यानंतर त्याची चौकशी केल्यानंतरच अपघाताचे खरे कारण समोर येईल. सिद्धेश हा डेहराडूनचा रहिवासी आहे. सध्या अपघाताचे कारण ओव्हर स्पीड असल्याचे सांगितले जात आहे. (Dehradun Accident)