नवी दिल्ली : नौदलाच्या ताफ्यातील पाणबुड्यांची क्षमता वाढवण्यासाठी संरक्षण मंत्रालयाने सुमारे २ हजार ८६७ कोटी रुपयांच्या २ करार केले आहेत. पाणबुड्यांची सहनशक्ती आणि अग्निशक्ती वाढवण्याच्या उद्देशाने या करारांवर सोमवारी दिल्लीत संरक्षण सचिव राजेश कुमार यांच्या उपस्थितीत स्वाक्षरी करण्यात आली.
संरक्षण मंत्रालयाने पहिला करार माजगाव डॉक शीपबिल्डर्स लिमिटेडसोबत केला आहे. डीआरडीओ पाणबुड्यांसाठी एअर इंडिपेंडेट प्रोपल्शन (एआयपी) प्लग प्रणाली विकसीत करत आहे. या प्रणालीसाठी सुमारे १ हजार ९९० कोटी रुपयांचा पहिला करार करण्यात आला. एआयपी प्लगमुळे पाणबुडींना वातावरणातील ऑक्सिजनची गरज नसताना उर्जा निर्माण करून अधिक काळ पाण्यात बुडवून ठेवता येणार आहे.
संरक्षण मंत्रालयाने फ्रान्सच्या नौदल समूहासोबत करण्यात आला. नौदलाच्या कलवरी-वर्गाच्या पाणबुड्यांवर इलेक्ट्रॉनिक हेवी वेट टॉर्पेडो (ईएचडब्ल्यूटी) एकत्रीकरण करण्यासाठी हा करार करण्यात आला. सुमारे ८७७ कोटी रुपयांचा हा करार आहे. ईएचडब्ल्यूटी हे प्रचंड क्षमता असलेले एक स्वयंचलित शस्त्र आहे. जे या शस्त्राने जहाजांना आणि पाणबुड्यांना लक्ष्य करता येते.
एआयपी तंत्रज्ञान हे डीआरडीओकडून विकसीत केले जात असलेले स्वदेशी तंत्रज्ञान आहे. एअर इंडिपेंडेंट प्रोपल्शन तंत्रज्ञानाने सुसज्ज असलेल्या पाणबुड्या पारंपारिक डिझेल-इलेक्ट्रिक पाणबुड्यांपेक्षा जास्त काळ पाण्याखाली राहू शकतात. एआयपी प्लगच्या बांधणीशी संबंधित प्रकल्प आणि त्याचे एकत्रीकरण पारंपारिक पाणबुड्यांची शक्ती वाढवेल आणि ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमात लक्षणीय योगदान देईल. यामुळे सुमारे ३ लाख रोजगार निर्मिती होईल, असे मंत्रालयाने जारी केलेल्या निवेदनात म्हटले आहे.