पुढारी ऑनलाईन डेस्क : हरियाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाला पुन्हा एकदा पराभवाला सामोरे जावे लागले. या निकालानंतर पक्षातील मतभेद आता चव्हाट्यावर येवू लागले आहेत. नेते पराभवाचे खापर एकमेकांवर फोडताना दिसत आहेत. दरम्यान, हरियाणा प्रदेश काँग्रेसचे प्रभारी दीपक बाबरिया (Deepak Babaria) यांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे.
विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर आता हरियाणचे प्रभारी दीपक बाबरिया आणि प्रदेशाध्यक्ष चौधरी उदयभान हे दोघही काही काळ रजेवर जाऊ शकतात, असे संकेतहायकमांडकडून मिळत होते. तसेच हरियाणा विधानसभा विरोध पक्षनेतेपदी गैर-जाट आमदाराला संधी देण्याबाबतही चर्चा सूरु आहे. विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर काँग्रेसमध्ये सध्या मंथन सुरू आहे. या पराभवाबाबत पक्षाच्या हायकमांडने राज्याचे प्रभारी दीपक बाबरिया आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हुड्डा यांच्याकडून उत्तर मागितले आहे.
हरियाणातील पराभवानंतर काँग्रेसचे प्रदेश प्रभारी दीपक बाबरिया यांनी पक्षनेतृत्वाचा राजीनामा दिला आहे. हरियाणा काँग्रेसच्या प्रभारी पदावरून आपली मुक्तता करावी, अशी विनंती त्यांनी पक्षेश्रेष्ठींकडे केली आहे. माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, हरियाणा विधानसभा निवडणुकीचाचा निकालानंतर दुसऱ्याच दिवशी मी राजीनामा देऊ केला होता. मला कोणत्याही पदाचा लोभ नाही. भाजपने हरियाणातील सुमारे १५ जागांवर ईव्हीएमच्या मदतीने अनियमितता केली आहे. हरियाणात भाजपच्या विजयासाठी १५ जागा महत्त्वाच्या होत्या. मी केवळ माझ्या स्वार्थासाठी कोणतेही पद सांभाळत आहे असे नाही. दिल्ली लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर मी राजीनामाही देऊ केला होता. मला आरोग्याच्या गंभीर समस्या आहेत आणि मला एकांतात राहण्याचा सल्ला देण्यात आला आहे, त्यामुळे मी 8 सप्टेंबर रोजी निवडणूक प्रचारात सहभागी होऊ शकलो नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले आहे.